कर्तव्यावर असताना जवान गणेश गावंडे यांना वीरमरण; उद्या जालन्यात अंत्यसंस्कार

भोकरदन : पोलीसनामा ऑनलाइन – जालना जिल्ह्यामधील भोकरदन तालुक्यातील भिवपूर येथील भारतीय सैन्य दलातील जवान गणेश संतोष गावंडे यांना पुणे येथे कर्तव्यावर असताना वीरमरण आले आहे. त्यांना सोमवारी (दि.21) हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचे निधन झालं आहे. ते 38 वर्षांचे होते. त्यांच्या मागे आई, पत्नी,दोन मुलं आणि तीन भाऊ असा परिवार आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, भोकरदन तालुक्यातील भिवपूर येथील जवान गणेश गावंडे हे 15 वर्षांपासून भारतीय सैन्य दलामध्ये मराठा बटालियन इन्फंट्रीमध्ये सेवा बजावत होते. मात्र, अवघ्या 4 दिवसांपूर्वीच त्यांची बदली इतर ठिकाणाहून पुण्यातील मराठा बटालियन रेस कोर्स पुणे येथे झाली होती.

त्या ठिकाणी ते सेवा बजावत असताना सोमवारी चौथ्या दिवशी सकाळी सहाच्या दरम्यान त्यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला, अन् त्यातच त्यांचे निधन झाले.

त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच भिवपूर गावासह तालुक्यात शोककळा पसरलीय. बुधवारी (दि.23) सकाळी 9 वाजता त्यांच्या मूळगावी भिवपूर येथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.