उपकाराची परतफेड ! त्यानं दुकानाचे नाव ठेवलं ‘सोनू सूद वेल्डींग वर्क शॉप’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – लॉकडाउन सुरु झाल्यानंतर देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये अडकून पडलेल्या स्थलांतरित मजुरांना गावी पाठवण्याची मोहिम अभिनेता सोनू सूदने हाती घेतली आहे. शेवटचा स्थलांतरित मजूर घरी पोहचेपर्यंत मी ही घर भेजो मोहीम सुरु ठेवणार आहे, असे सांगणार्‍या सोनूवर देशभरातील राजकारण्यांपासून ते कलाकारांपर्यंत अनेकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. ओदिशामधील एका मजूराने थेट दुकानालाच सोनूचे नाव देत आगळ्यावेगळ्या पद्धतीने त्याचे आभार मानले आहेत.

मानव मंगलानी या सेलिब्रिटी फोटोग्राफरने इन्स्टाग्रामवरुन या दुकानाचा फोटो शेअर केला आहे. या पोस्टमध्ये कॅप्शन देताना मानव यांनी सोनूला टॅगही केले आहे. ही जरी एखादी जाहिरात वाटत असली तरी हे सोनूबद्दलच्या प्रेमातून केलेले आहे. सोनूच्या मदतीने एअर लिफ्ट करुन कोच्चीनहून ओदिशाला पाठवण्यात आलेल्या मजुरांपैकी एकाने स्वत:चे वेल्डींगचे दुकान सुरु केले असून त्याला ‘सोनू सूद वेल्डींग वर्क शॉप’ असे नाव दिले आहे. स्थलांतरितांसाठी देवदूत म्हणून काम करणार्‍या सोनूबद्दल प्रेम व्यक्त करण्याचे हे प्रयत्न खरोखरच खूप आनंद देणारे आहेत, असे मानव याने पोस्टमध्ये म्हटले आहे.