एसपी (SP) शर्मा यांनी केली 21 किलोमीटरची मॅरेथॉन पूर्ण

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन – नगरमध्ये आयोजित केलेली 21 किलोमीटरची मॅरेथॉन पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा व उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पूर्ण केली. दैनंदिन कामाच्या ताणातून वेळ काढून ते नियमितपणे धावण्याचा सराव करतात.
‘नगर रायझिंग’च्या वतीने आज शहरातून 21 किलोमीटरचे मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आले होते. या स्पर्धेत हजारो जणांनी सहभाग नोंदवला होता. पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, उपवनसंरक्षक रेड्डी या दोन अधिकाऱ्यांनीही सदर स्पर्धेत सहभाग घेतला होता. सुरुवातीला हे अधिकारी काही किलोमीटर अंतर धावतील, असे वाटत होते. मात्र सदर अधिकाऱ्यांनी तब्बल 21 किलोमीटरचे अंतर पूर्ण केले.
या अगोदर हैदराबाद येथे बारा वर्षांपूर्वी एस. पी. शर्मा यांनी अर्ध मॅरेथॉन पूर्ण केली होती. त्यावेळी ते हैदराबाद येथील सरदार वल्लभभाई पोलीस अकॅडमीत प्रशिक्षण घेत होते. आता दैनंदिन कामाचा जास्त व्याप असतानाही काही महिन्यांपासून ते सकाळी नियमितपणे पळण्याचा व्यायाम करतात. पोलिस प्रशासनाच्या वतीने आयोजित केलेले मॅरेथॉन स्पर्धेत त्यांनी मागील महिन्यात पाच किलोमीटरचे अंतर पूर्ण केले होते. त्यानंतर शर्मा यांनी नगर रायझिंग मॅरेथॉनची तयारी सुरू केली होती. त्यानुसार आज 21 किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेऊन त्यांनी सदरचे मॅरेथॉन पूर्ण केले.
जिल्ह्यात यापूर्वी काम करणारे पोलीस अधीक्षक कृष्ण प्रकाश हेही अनेक मॅरेथॉन स्पर्धेत धावायचे. त्यांच्यानंतर रंजनकुमार शर्मा हे मॅरेथॉनपट्टू पोलीस अधीक्षक नगरला मिळाले आहेत.