मतदार नोंदणीसाठी 2 व 3 मार्चला भोकर विधानसभा मतदार संघात विशेष मोहीम

भोकर : पोलीसनामा ऑनलाईन -(माधव मेकेवाड)- आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मतदार नोंदणीपासून वंचित राहिलेल्या 85-भोकर विधानसभा मतदार संघात नागरिकांच्या मतदार नोंदणीसाठी शनिवार 2 व रविवार दि. 3 मार्च 2019 रोजी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे,अशी माहिती मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी भोकर यांनी दिली आहे.

दि. 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. तथापि, यामध्ये मतदार नोंदणी झाली नाही अशा वंचित नागरिकांसाठी मतदार नोंदणीची आणखी एक संधी मिळावी या उद्देशाने नुकतीच दि. 23 आणि 24फेब्रुवारी रोजी विशेष मोहीम राबविण्यात आली. तथापि, या मोहिमेवेळीही मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करू न शकलेल्या नागरिकांना आणखी संधी देण्यासाठी येत्या शनिवारी आणि रविवारी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.

सर्व अर्ज उपलब्ध
या दिवशी सर्व मतदान केंद्रांच्या ठिकाणी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) नागरीकांकडून नाव नोंदणीसाठी अर्ज स्वीकारणार आहेत. बीएलओंकडे नमुना क्र. 6, 7, 8 व 8अ चे अर्ज उपलब्ध असतील. तसेच नागरीकांना आपले नाव मतदार यादीत तपासण्यासाठी दि. 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर प्रसिद्ध करण्यात आलेली अंतिम मतदार यादी बीएलओंकडे उपलब्ध असेल.

वेबसाईट व टोल फ्री क्रमांक
मतदारांच्या सोयीसाठी www.nvsp.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नाव नोंदणीची सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आली आहे. अधिक माहिती www.ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 1950 हा टोल फ्री क्रमांकही उपलब्ध करुन देण्यात आला असून नागरिकांनी या क्रमांकावर संपर्क साधून मतदार नोंदणीविषयक अधिक माहिती जाणून घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

राजकीय पक्षांनाही विनंती
या कार्यक्रमाची माहिती सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना देण्यात आली असून प्रत्येक मतदान केंद्राकरीता त्यांच्या मतदान केंद्रस्तरीय सहाय्यकाची (बीएलए) नेमणूक करण्याची विनंती करण्यात आली आहे. मतदार केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या मदतीने मतदार याद्या अधिक अचूक व परिपूर्ण करण्यासाठी निवडणूक यंत्रणेला सहकार्य करावे अशी विनंतीदेखील राजकीय पक्षांना करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणूक-2019 करिता नव मतदारांना शेवटची संधी आहे. त्यामुळे या विशेष मोहिमेचा नव मतदारांनी मतदार यादीत नाव समाविष्ट करुन घ्यावे…असेही आव्हान मा. श्री. पवन चांडक (मतदार नोंदणी अधिकारी 85-भोकर विधानसभा मतदारसंघ तथा उपविभागीय अधिकारी भोकर यांनी केले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like