धुळे : साक्री तालुक्यात विहिरीत कार कोसळली; एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन  –   साक्री तालुक्यातील दिघावे गावाजवळील विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. दरम्यान, या अपघातातून चालक बचावला असून लग्नानिमित्ताने कारने जाताना हा अपघात घडला.

सटाणा येथील रहिवाशी असलेले शंकर यादवराव बोडके हे मारुती कार (क्र. एमएच ०२, १७४०) मधून बळसाने येथून लग्नानिमित्ताने दुपारी दिघावे (ता.साक्री) येथे जात होते. यावेळी कारमध्ये अन्य चार जण होते. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने दिघावे फाट्याशेजारील विहिरीत कोसळली. कार विहिरीत कोसळल्याची माहिती मिळताच गावकरी मदतीला धावले. सरपंच विशाल दिसले तसेच गावकरी तरुण तात्काळ मदतीसाठी धावले. शंकर बोडके यांना वाचविण्यात यश आले. मात्र इतर चार जणांचा या अपघातात जागीच मृत्यू झाला. साक्री पोलिसांनी घटनास्थळी धाव स्थानिकांच्या मदतीने विहिरीतून कार बाहेर काढली. मृतांमध्ये एक मुलगा, एक महिला आणि दोन मुलींचा समावेश असून दोघं मुलींचे मृतदेह विहिरी बाहेर काढण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ आणि पोलीस यंत्रणा प्रयत्न करीत आहे. विहिरीला कठडे नसल्यामुळे अनियंत्रित कार खोल विहिरीत जाऊन पडली. दरम्यान विहिरीत गाळही भरपूर असल्याने गाडीतील कोणाला सावरण्याची संधी मिळाली नाही. हा अपघात नेमका कसा झाला हे अद्याप स्पष्ट झाले नाही.