संजय राऊतांनी केली मोठी मागणी, म्हणाले – ‘देशात युद्धासारखी स्थिती…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   देशात कोरोनाने थैमान घातले आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण येत आहे. देशाच्या अनेक राज्यात बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शन, वेंटिलेटर्स अभावी रुग्णांचा मृत्यू होत असल्याचे समोर आले आहे. कोरोनाची ही लाट थोपवण्यासाठी केलेल्या विविध उपाययोजना तोकडया पडत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एक टि्वट केले आहे. देशात एक अभूतपूर्व आणि युद्धासारखी स्थिती निर्माण झाली असून बेड्स, ऑक्सिजन आणि लस उपलब्ध नाहीत. फक्त सर्वत्र एकच गोंधळ आहे. या परिस्थितीत कोरोनाच्या स्थितीवर चर्चा करण्यासाठी संसदेचे दोन दिवशीय विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी खासदार राऊतांनी केली आहे.

दरम्यान कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात लॉकडाऊन केला असला तरी रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाही. गेल्या 24 तासांत राज्यात 68 हजार 631 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 45 हजार 654 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. चिंता वाढवणारी माहिती म्हणजे गेल्या 24 तासांत राज्यात 503 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोना संकट आल्यापासून राज्यात आतापर्यंत राज्यात 60 हजार 473 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर 31 लाख 06 हजार 828 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडले आहे. राज्यात सध्या कोरोनाचे 6 लाख 70 हजार 388 सक्रिय रुग्ण आहेत.