खासगी शिक्षणसम्राटांना दणका, शिक्षक भरतीचा हक्क राज्य सरकारकडे  

उस्मानाबाद:पोलीसनामा ऑनलाईन

राज्यभरातील खासगी शिक्षण संस्थांना ऊत आला आहे. पण आता राज्य सरकारने खासगी शिक्षण सम्राटांना मोठा दणका दिला आहे. सरकारने आता अनेक दिवस रखडलेला खासगी शाळेतील शिक्षक भरतीचा निर्णय जाहीर केला आहे.  खासगी अनुदानित शाळांमध्ये  शिक्षक भरती राज्य सरकारमार्फत करण्यात येणार आहे. हा निर्णय सरकारने २३ जून २०१७ रोजी घेतला होता. पण राजकीय कारणास्तव त्याची अंमलबजावणी होत नव्हती. पण आता मात्र शिक्षक भरतीचा हा निर्णय जाहीर केला आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, दरवर्षी मे महिन्यात शाळांमधील शिक्षक भरती राज्य सरकारच करणार आहे. विशेष म्हणजे या भरतीसाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. ‘व्हिजिबल टू ऑल टिचर्स’ या पोर्टलचा उपयोग यासाठी केला जाणार आहे. शिक्षक सेवकांना कोणती संस्था मिळेल याचे नियंत्रण देखील राज्य सरकारकडेच असेल. समायोजन झाल्यानंतर वर्षातून दोन वेळा शिक्षण सेवकांची भरती होईल. राज्य सरकार अभियोग्य आणि बुद्धिमत्ता चाचणीवर आधारित शिक्षणसेवकांची खासगी अनुदानित, विनाअनुदानित, अनुदानास पात्र शाळांत नियुक्ती करणार आहे.

अशा भरती प्रक्रियेतून अल्पसंख्यांक वर्गाच्या शाळांना वगळण्यात आले आहे. खाजगी संस्थेतील पहिली भरती १२ डिसेंबर २०१७ ते २१ डिसेंबर २०१७ या कालावधीत झालेल्या परीक्षेवर आधारित असेल. सरकारकडून जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी आणि महापालिकेत महापालिकेचे आयुक्त सरकारकडून भरती प्रक्रिया पूर्ण करणार आहेत.