‘पोलिसांवरील हल्ले सहन केले जाणार नाहीत’

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पोलिसांवर वारंवार होणारे हल्ले ही राज्याच्या दृष्टीने लज्जास्पद बाब असून शोभणारी गोष्ट नाही. पोलीस जनतेच संरक्षण करतात, पण तेच पोलिस आज असुरक्षित आहेत. भविष्यात पोलिसांवरील भ्याड हल्ले सहन केले जाणार नाहीत, असा इशारा विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दिला आहे.

वाहतूक नियमन करताना पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागाचे पोलीस शिपाई रवींद्र करवंदे यांना लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. त्यात करवंदे गंभीर जखमी झाले. त्यामुळे करवंदे यांची दरेकर यांनी सोमवारी कासारवाडी येथे खासगी रुग्णालयात भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. दरेकर म्हणाले, जखमी पोलीस करवंदे यांच्या तब्बेतीची चाैकशी केली. त्यांची प्रकृती आता चांगली असल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. पोलिसांच्याच सुरक्षेची चिंता असेल तर त्यांची सुरक्षा करा, अशी कोणाकडे मागणी करायची? ही सरकारची जबाबदारी आहे. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत राज्य सरकारने व्यवस्थेवर नीट लक्ष ठेवत समाजातील अशा प्रवृत्तीच्या लोकांची प्रवृत्ती मुळासकट ठेचली पाहिजे.

पद्मश्री पुरस्कार प्राप्त चिंचवड येथील गिरीश प्रभुणे यांच्या संस्थेला मिळकत कर थकविल्याप्रकरणी महापालिकेने नोटीस बजावली आहे. मात्र नोटिशीला तात्पुरती स्थगिती दिली आहे. त्याबाबत दरेकर म्हणाले, महापाैर, सभागृह नेता किंवा स्थायी समितीचा अध्यक्ष नोटीस पाठवित नाहीत. प्रशासन किंवा संबंधित विभागाकडून नोटीस बजावली जाते. त्यांच्याशी सत्ताधाऱ्यांचा संबंध नसतो. तरीही पुरस्कारप्राप्त व्यक्तींना नोटीस पाठविली असेल तर पालिकेतील भाजपचे पदाधिकारी याची दखल घेतील. नोटीस का पाठविली याची विचारणा करून पुरस्कार्थींचा सन्मान राखला जाईल असे दरेकर म्हणाले.