Video : ‘राज्य सरकारनं Tax कमी करून पेट्रोल-डिझेलचे दर खाली आणावेत’ – देवेंद्र फडणवीस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –  पेट्रोल- डिझेलचे दर दररोज वाढत आहेत. दिवसेंदिस वाढणाऱ्या दराने आता पेट्रोल शंभरी पार करण्यासारखी स्थिती आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलांच्या किंमती कमी असतानाही आपल्याकडे पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडलेत. याच पार्श्वभूमीवर येत्या 5 तारखेला शिवसेना राज्यभर दरवाढीविरोधात मोर्चे काढून केंद्र शासनाचा निषेध करणार आहे. मात्र, शिवसेनेचे आंदोलन म्हणजे नौटंकी असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. राज्य सरकारनेच टॅक्स कमी करुन पेट्रोलचे भाव कमी करावेत, अशी सूचना केली आहे.

लॉकडाऊननंतर वाहतूक व्यवसायाची घडी आता पूर्वपदावर येत असतानाच सरकारने इंधन दरवाढ केली आहे. भारतात जे इंधन आयात केले जाते. त्याची लॅंड कॉस्ट 30 रुपये प्रति लीटर असताना केंद्र सरकार 23 टक्के अबकारी कर तर राज्य सरकार व्हॅट, स्वच्छता, कोविड यासारखे सेस आकारत असल्याने एकंदर कर आकारणी 50 रुपये झाल्याने इंधनाचे भाव उच्चांकी पातळीला पोहचले आहेत. इंधन दरवाढीविरोधात शिवसेना आता आंदोलन करणार आहे.

यावर फडणवीस म्हणाले की, शिवसेनेने इंधन दरवाढीविरोधात मोर्चे काढण्यापेक्षा राज्यातील टॅक्सेस कमी करावेत. कारण, पेट्रोल आणि डिझेल अजूनही व्हॅटच्या रेजिंगमध्ये असून त्याला जीएसटी नाही. त्यामुळे त्याची दरवाढ ही महाराष्ट्रात जास्त होते. कारण, महाराष्ट्र सरकारचे स्वत:चे टॅक्सेस जास्त असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. आमचं सरकार असताना, अशाच रितीने इंधन दरवाढ झाली होती, त्यावेळी आम्ही राज्यातील पेट्रोलवरील टॅक्सेस कमी केले होते. त्यानंतर, पेट्रोल-डिझेलचे दर 2 रुपयांनी कमी झाले होते. विशेष म्हणजे महाराष्ट्र सरकारच एकही रुपयाचेही नुकसान झाले नव्हते. त्यामुळे, ठाकरे सरकारनं नौटंकी बंद करावी आणि आम्ही जे करुन दाखवल होते, ते कराव असे फडणवीस यांनी म्हटले आहे.