राज्य उत्पादन शुल्कचे सांगली विभागाचे निरीक्षक एस. डी. चाैगुले निलंबित

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन

पलूस तालुक्यातील कुंडल येथील क्रांती सहकारी साखर कारखान्यामधील आसवणी प्रकल्पावर कारवाई करण्यास दिरंगाई केल्याच्या कारणावरुन राज्य उत्पादन शुल्कच्या सांगली विभागाचे तत्कालीन निरीक्षक एस. डी. चाैगुले यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे चाैगुले यांनीच या कारखान्यावर कारवाई करण्याच्या सुचना दिल्या होत्या. मात्र वरिष्ठांच्या चाैकशी दरम्यान त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.

सांगली शहर विभागाचा चौगुले यांच्याकडे कार्यभार होता. तसेच काही महिन्यापूर्वी विटा विभागाचा त्यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार दिला गेला होता. क्रांती कारखान्याच्या आसवाणी प्रकल्पाला त्यांनी भेट देऊन पाहणी केली होती. तशा कारखान्याकडे नोंदी आहेत. दरम्यान मे महिन्यात चौगुले यांची पुण्याला बदली झाली. २१ मे रोजी त्यांनी सांगलीचा कार्यभार सोडला. त्यावेळी त्यांनी वरिष्ठांना क्रांती कारखान्याने बेकायदा स्पिरीटचे उत्पादन केल्याची माहिती दिली. त्यानंतर ते पुण्याला निघून गेले. चार दिवसानंतर सांगलीच्या पथकाने कारखान्यावर छापा टाकली. या छाप्यात १८ लाख लिटर स्पिरीट जप्त केले होते. याप्रकरणी प्रकल्पाच्या व्यवस्थापकाला अटक केली होती.

१८ लाख रुपये स्पिरीटचे उत्पादन होईपर्यंत अधिकाऱ्यांना याची खबर कशी लागली नाही. असा समज करुन वरिष्ठांनी कोणतीही चौकशी न करता चौगुले यांना दोषी धरुन तडकाफडकी निलंबित केले आहे. वास्तविक चौगुले यांनीच कारखान्यातील बेकायदा स्पिरीट उत्पादनाची माहिती दिली होती. ही बाब सांगलीतील अधिकाऱ्यांनी वरिष्ठांना सांगितली नाही. आपल्यावर कारवाई होऊ नये, यासाठी काही अधिकाऱ्यांनी चौगुले यांना पुढे केल्याची चर्चा सुरु आहे.