Pune News : सिनेरसिकांनो, PIFF महोत्सव पुढे ढकलला; 18 ते 25 मार्च दरम्यान ऑनलाईन होणार महोत्सव

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे फिल्म फाउंडेशनने 11 ते 18 मार्च दरम्यान होणारा 19 वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. चित्रपटगृहात होणाऱ्या महोत्सवाच्या नवीन तारख्या येत्या काही दिवसात जाहीर केल्या जातील. मात्र ऑनलाईन पद्धतीने होणारा चित्रपट महोत्सव येत्या 18 ते 25 मार्च दरम्यान होईल,अशी माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष आणि महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी दिली आहे.

डॉ. पटेल म्हणाले की, पुण्यात सध्या कोरोना रुग्णसंख्येमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे चित्रपटगृहात येण्याबाबत प्रेक्षकामध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. त्यामुळे महोत्सव काही दिवसांसाठी पुढे ढकलण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. महोत्सव पुढे ढकलला असला तरी येत्या 18 ते 25 मार्च दरम्यान ऑनलाईन पद्धतीने महोत्सव होणार आहे. ज्या प्रेक्षकांना ऑनलाईन पद्धतीने महोत्सवात सहभागी व्हायचे आहे. त्यांना देखील आवश्यक ती नोंदणी ‘पिफ’च्या संकेतस्थळावरून करता येईल. तसेच यापूर्वी चित्रपटगृहात होणाऱ्या महोत्सवासाठी नोंदणी केलेल्या प्रेक्षकांना ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या महोत्सवात सहभागी व्हायचे असेल, तर तो बदल करून घेणे शक्य होईल. ज्यांनी या आधीच ऑनलाईन पद्धतीच्या महोत्सवासाठी नोंदणी केली आहे, त्यांना कोणतीही नवीन प्रक्रियेची गरज नाही. ऑनलाईन महोत्सवात जागतिक चित्रपट विभागातील निवडक 26 चित्रपट दाखविण्यात येणार असल्याचे डॉ. पटेल म्हणाले.