मुंबईत रेमडेसिवीरची 2200 इंजेक्शन जप्त

पोलीसनामाः पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना रुग्णांसाठी वरदान ठरलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई सुरू आहे. मुंबई पोलिसांनी एफडीएच्या मदतीने मंगळवारी (दि. 20) अंधेरीतील मरोळ आणि न्यू मरिन लाइन्स येथे छापेमारी करून 2 हजार 200 रेमडेसिविर इंजेक्शन जप्त केले.

राज्यात सर्वत्र रेमडेसिविरचा तुटवडा असताना मुंबईत काही वितरकांनी रेमडेसिविरची साठेबाजी करून ठेवल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली हाेती. त्यानुसार मंगळवारी मुंबई पोलीस आणि एफडीएच्या पथकाने अंधेरीतील मरोळ व न्यू मरिन लाइन्स येथे छापा टाकला. या कारवाईत मरोळ येथून 2 हजार आणि न्यू मरिन लाइन्स येथून 200 इंजेक्शन असे 2200 इंजेक्शन जप्त केले आहेत. हा सर्व साठा एफडीएला दिला असून तो रुग्णालयाला देणार असल्याची माहिती पोलीस प्रवक्ते चैतन्या एस. यांनी दिली. दरम्यान रेमडेसिविरचा काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश यापूर्वीच मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिले आहेत.