Solapur News : सोलापूर ग्रामीणच्या पोलिस पथकावर दगडफेक, 3 कर्मचारी जखमी

कुर्डुवाडी : पोलीसनामा ऑनलाइन – एका गुन्ह्याच्या घटनेतील संशयित आरोपींना पडकण्यासाठी बारलोनी (ता. माढा) गेले असता सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील गुन्हे अन्वेषण शाखेच्या तपास पथकावर दगडफेक करण्यात आली. ही घटना शुक्रवारी (८ जानेवारी) सकाळी घडली असून, त्यात गुन्हे शाखेचे तीन पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सांगोला येथील एका गुन्ह्याच्या आरोपींना पडकण्यासाठी सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे, सहायक पोलीस उपनिरीक्षक ख्वाजा मुजावर, पोलिस हवालदार नारायण गोलेकर, पोलिस हवालदर धनाजी गाडे, पोलिस हवालदार मोहन मनसावले, पोलिस शिपाई अक्षय दळवी, पोलिस शिपाई धनराज गायकवाड व चालक पोलिस शिपाई समीर शेख यांचे पथक बारलोनी गावाच्या परिसरात तपासासाठी आले होते. तेव्हा पथक आल्याचे पाहताच संबंधित आरोपींनी सरकारी पोलीस गाडीवर हल्ला करत दगडफेक केली.

हल्लेखोरांनी केलेल्या दगडफेकीत तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले. त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, हल्ला झाल्यानंतरही कुर्डुवाडी पोलिसांना यांची माहिती नव्हती. वरिष्ठांकडून कळल्यानंतर पोलिसांची धावाधाव सुरु झाली. तोपर्यंत सोलापूर ग्रामीण पोलिसांचे अधिकची पथके बारलोनी गावात दाखल झाली. या घटनेनंतर गावात तणावपूर्ण शांतता पसरली आहे.