कलम 370 ! 28 दिवसानंतर काश्मीरमधील परिस्थिती ?, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीरमध्ये भारताने कलम 370 रद्द केलेल्या आणि 35 अ हटविलेल्या घटनेला 28 दिवस झाले आहेत. मात्र अजूनही काश्मीरमधील परिस्थिती निवळलेली नाही. हिवाळी राजधानी श्रीनगरमधील परिस्थिती अजूनही सामान्य झाली नसून लोकप्रिय बाजार सलग चार आठवडे बंद असून अजूनही सुरु झालेला नाही.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काश्मीर घाटी तसेच श्रीनगरमध्ये कोणत्याही प्रकारचा प्रतिबंध लावण्यात आलेला नसून शनिवारी देखील येथील परिस्थिती सामान्य होती. घाटीमधील सर्व दुकाने आणि सार्वजनिक वाहतूक देखील मोठ्या प्रमाणत बंद होती. काही ठिकाणी तुरळक वाहतूक सुरु होती. अशीच परिस्थिती ग्रामीण भागांबरोबरच शहरी भागात देखील आहे. पाच ऑगस्टपासून शहर ए खासमध्ये कलम 144 लागू असून याठिकाणी चारपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. काही ठिकाणी तुरळक दगडफेकीच्या घटना वगळता अन्य ठिकाणी शांतता आहे.

काश्मीरमध्ये फक्त 200 दहशतवादी शिल्लक –

जम्मू काश्मीरच्या राज्यपालांचे सहाय्यक फारूक खान यांनी सांगितले कि, अनेक ठिकाणी परिस्थिती सामान्य असून काश्मीर घाटीत दहशतवाद्यांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली असून सध्या केवळ 150-200 दहशतवादी शिल्लक आहेत. दहशतवाद्यांनी परिणाम भोगण्यासाठी तयार राहावे. पाकिस्तान काश्मीरच्या बाबतीत 1947 पासून कागाळ्या करत असून त्यांच्याकडून चांगल्या वागणुकीची अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे. मागील काही दशकांपासून या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी येथील नागरिकांची मोठी मदत झाल्याचे देखील त्यांनी सांगितले. ते आमचे डोळे आणि कान असल्याचे त्यांनी म्हटले.

दरम्यान, घाटीतील शाळा उघडल्या गेल्या असून विद्यार्थ्यांची संख्या मात्र सध्या कमी आहे. मात्र हळूहळू तीदेखील वाढेल असा विश्वास खान यांनी व्यक्त केला. लवकरच 9 ते 12 वि च्या बोर्डाच्या परीक्षेची तयारी करणार असून विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नाही. त्याचबरोबर त्यांनी काश्मीरमधील जनतेला आवाहन केले आहे कि, तुम्ही भविष्यात लागू होणाऱ्या नियमांची कोणतीही काळजी करण्याची गरज नसून आगामी काळात तुमचा मोठ्या प्रमाणात विकास झालेला तुम्हाला आढळून येणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त