उपविभागीय अधिकाऱ्यांकडे ज्येष्ठांना दाद मागता येणार

नांदेड: पोलीसनामा आॅनलाइन (माधव मेकेवाड) – वृद्ध महिला व पुरुषांच्या अडचणी दूर करण्यासाठी शासनाने मोठे पाऊल उचलले आहे. वृद्धांची उपेक्षा टाळण्यासाठी, त्यांची काळजी व देखभाल घेण्याबाबत मुलांवर कायदेशीर जबाबदारी व दायित्व टाकण्यासाठी केंद्र सरकारने आईवडील व ज्येष्ठ नागरिकांच्या चरितार्थ, कल्याणासाठी २००७ व २०१० मध्ये अधिनियम केला आहे.

त्यानुसार जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी त्या त्या कार्यक्षेत्रातील पिठासिन अधिकारी म्हणून कार्यरत राहणार आहेत.

उपेक्षित आणि मुलांकडून देखभाल न होणा-या जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांना केंद्र शासनाच्या अधिनियम २००७ व २०१० अधिनियमाद्वारे त्यांच्या कार्यक्षेत्रातील पिठासिन अधिका-याकडे दाद मागता येणार आहे.

मुले योग्य देखभाल व काळजी घेत नसल्यास मुलांवर कायदेशीर कार्यवाही करण्याची तरतूदही या अधिनियमात आहे. त्याचवेळी ज्येष्ठ नागरिकांची चरितार्थ व कल्याणासाठी या अधिनियमात तरतूद करण्यात आली आहे.