उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणाले सुपर ‘संभाजीनगर’, नेटीझन्स म्हणतायेत अधिकृत नामांतरण कधी करणार…???

पोलिसनामा ऑनलाईन – गेल्या वर्षभरापासून शिवसेना पक्षप्रमुख हेच राज्याचे मुख्यमंत्री असतानाही औरंगाबादचे संभाजीनगर झाले नाही. मात्र, अद्यापही शिवसेना नेत्यांकडून औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असाच केला जातो. आता, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक बातमी शेअर केली. त्यात देसाई यांनी औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा केलाय. पण, नेटीझन्सने यास आक्षेप घेत, संभाजीनगर नाव कधी होणार? असा उलटप्रश्नच देसाई यांना विचारला आहे.

औरंगाबाद हे शहर मराठवाड्याची राजधानी म्हणून ओळखले जाते. औरंगाबाद शहराचं नामांतर करुन या शहराला संभाजीनगर हे नाव देण्याची शिवसेनेची आग्रही मागणी आहे. औरंगाबाद शहराचे अद्यापही नामांतर झाले नाही, शहराचे नाव अद्यापही औरंगाबादच आहे. मात्र, तरीही एका कॅबिनेटमंत्र्याने औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा केलाय. त्यामुळे, नेटीझन्सने त्यांना आधी संभाजीनगर असे नामांतर करण्याचं सूचवलं आहे. ट्विटरवर त्यांच्या पोस्टला कमेंटमध्ये काही जणांनी संभाजीनगर कधी होणार? असा प्रश्नही देसाई यांना विचारला आहे.

दरम्यान, सुभाष देसाई यांच्या ट्विटरवर अनेकांनी कमेंट करुन औरंबादमधील कामगारांचा प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली आहे. जनरल मोर्टर्सचा कारखान बंद होत असून तेथील २००० कामगार बेरोजगार होत असल्यानं इकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त केली आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई हे औरंगाबादचे पालकमंत्री आहेत, त्यामुळे औरंगाबाद शहरात गुंतवणूक आणि रोजगारनिर्मित्तीसाठी त्यांचे प्रयत्न असतात. नुकतेच, मॅग्नेटीक महाराष्ट्र 2.0 नुसार राज्यात मोठी गुंतवणूक होत आहे. औरंगाबादमध्ये ७,५०० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. यासंदर्भात वर्तमानपत्रात छापून आलेली बातमी सुभाष देसाई यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केली आहे. त्यानुसार औरंगाबाद शहरात ७,५०० रुपयांची गुंतवणूक होणार असून १० हजार रोजगार निर्माण होणार आहेत. देसाई यांनी ही बातमी शेअर करताना, सुपर संभाजीनगर असे कॅप्शन दिलंय.