महापालिका आयुक्तांच्या कारभाराची चौकशी करणार- सुभाष देशमुख

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन
सांगली, कुपवाड आणि मिरज महापालिकेचे आयुक्त रवींद्र खेबूडकर यांच्या कारभाराची चौकशी करण्यात येईल. त्यासाठी समिती नियुक्त करण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी आज येथे पत्रकाराशी बोलताना दिली.

महापालिकेचे आयुक्त महापालिकेच्या सभांना अनुपस्थित राहत आहेत. महापालिका क्षेत्रात काम चांगले नसल्याने नागरीक जिल्हाधिकार्‍यांकडे गार्‍हाने मांडण्यासाठी येत आहेत. त्यासंदर्भात विचारले असता , मंत्री देशमूख म्हणाले, या प्रकरणी आयुक्तांच्या कारभाराची चौकशी करण्यात येईल. नेमका काय प्रकार आहे, हे पाहिल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल.

ते म्हणाले, जिल्हा परिषद ग्रामीण भागातील शाळेत गरीबांची मुले शिकतात. मात्र, अनेक वर्षांपासून निधीअभावी शाळांच्या दुरूस्तीवर खर्च झालेला नाही. त्यामुळे या शाळांची जीर्ण अवस्था झाली आहे. अनेक शाळांचे पत्रे वादळामुळे उडून गेले आहेत. त्यामुळे या शाळांसाठी नाविन्यपूर्ण योजनेतून किंवा अखर्चित निधीतून 14 कोटी रुपयांचा निधी मिळावा, अशी मागणी सर्वच जिल्हा परिषद सदस्यांनी केली. भविष्यात ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेताना गरीबांची मुले सुरक्षित राहतील, या दृष्टीने या शाळांना जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न आहे. शासनाबरोबरच जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर असणार्‍या मूळच्या सांगली जिल्ह्यातील अधिकारी, उद्योजक, अन्य मान्यवर यांनी या शाळांना सामाजिक बांधिलकी म्हणून मदत करावी असे देशमुख म्हणाले, 21 जून जागतिक योग दिन आहे. या दिवशी जत तालुक्यातील बालगाव येथे भव्य योग शिबिर आयोजित केले आहे. या शिबिरात सांगलीसह सोलापूर, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांनी अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे. ग्रिनिच बुकात या शिबिराची नोद व्हावी, यासाठी सांगलीकरांनी प्रयत्न करावेत.

सोलापूर येथील माझा बंगला अधिकृतच
पालकमंत्री देशमुख म्हणाले, सोलापूर येथील माझा बंगला अधिकृतच आहे. ही जागा मी खरेदी केलेली आहे. त्या ठिकाणी आरक्षणाची गरज नसल्याचा ठराव, महापालिकेने केला आहे. बांधकामासाठी दोन वेळा परवानगी मागितली आहे. आयुक्तांनी आताचा दिलेला अहवाल चुकीचा आहे. मला यासंदर्भात कोणाशीही चर्चा करण्याची गरज नाही. आवश्यकता वाटल्यास न्यायदेवतेकडे न्याय मागणार.