स्कॉर्पिन श्रेणीतील तिसरी पाणबुडी ‘INS करंज’ आजपासून नौदलाच्या ताफ्यात दाखल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – हिंद महासागरात सक्रिय असलेल्या चीनला टक्कर देतानाच शेजारील पाकिस्तानचीही चिंता वाढवणारी स्कॉर्पिन श्रेणीतील तिसरी पाणबुडी आयएनएस करंज बुधवारपासून (दि. 10) नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली आहे. पाणबुडीला मुंबईतील वेस्टर्न कमांडच्या नेव्हल हेडक्वार्टरमध्ये लष्करी परंपरेनुसार युद्धनौकांमध्ये सामील केले आहे. मेक इन इंडिया अंतर्गत तयार केलेली ही पाणबुडी कोणताही आवाज न करता शत्रूच्या हद्दीत प्रवेश करुन हल्ला करते. या पाणबुडीमुळे नौदलाचे सामर्थ वाढले आहे.

फ्रान्सच्या मदतीने मुंबईतील माजगाव डॉकयार्डने आयएनएस करंजची निमिर्ती केली आहे. केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया मोहिमेअंतर्गत स्वदेशी बनावटीच्या 6 पाणबुड्यांची बांधणी सध्या माजगाव डॉकमध्ये सुरु आहे. त्यातीलच एक असलेली आयएनएस करंज सर्व यशस्वी चाचण्यांनतर नौदलाच्या ताफ्यात सामील झाली आहे. यापूर्वी स्कॉर्पेन क्लासच्या कलवरी आणि खांदेरी देखील युद्धानौकांमध्ये दाखल झाल्या आहेत. तर चौथ्या पाणबुडीच्या उर्वरित समुद्री चाचण्या सुरू आहेत. पाचवी पाणबुडी वागीर देखील लॉन्च केली आहे. करंज पाणबुडी 221 फूट लांब, 40 फूट उंच, खोली 19 फूट, 1565 टन वजनाची आहे. करंज पाणबुडी 350 मीटर खोलवर जाऊन शत्रूचा शोध घेते. या पानबुडीचा टॉप स्पीड 22 नोट्स आहेत. भारतीय सीमांच्या सुरक्षेस धोका वाढत असल्याने समुद्री सुरक्षा आणखी अभेद्य करण्याची तयारी केली जात आहे.