साखर कारखान्याच्या अधिकाऱ्याचा मारहाणीत मृत्यू; सहसंचालकासह 6 जणांना अटक, राष्ट्रवादीचे माजी आमदार ‘गोत्यात’ ?

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन –   साखरेची हेराफेरी केल्याचा आरोप करत साखर कारखान्यातील प्रोसेसिंग हेड म्हणून कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याला बेदम मारहाण करण्यात आली. गंभीर जखमी झालेल्या अधिकाऱ्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना सातारा जिल्ह्यातील पडळ येथील खटाव माण साखर कारखान्यात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्यासह 19 जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

जगदीप थोरात असे मृत्यू झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. थोरात हे पडळ येथील के. एम. शुगर कारखान्यामध्ये प्रोसेसिंग हेड म्हणून कार्य़रत होते. 10 मार्च रोजी थोरात यांच्यावर साखरेच्या अफरातफरीचा आरोप करण्यात आला. या आरोपावरून थोरात यांना कारखान्यात बेदम मारहाण करण्यात आली. यानंतर थोरात यांना 11 मार्च रोजी पहाटे त्रास होऊ लागल्याने कुटुंबाने त्यांना तातडीने कराड येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान जगदीप थोरात यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी कराड शहर पोलिसांनी अकस्मिक मृत्यू नोंद केली. मात्र, थोरात यांच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी आक्रमक पवित्रा घेतला. यानंतर पोलिसांनी थोरात यांच्या कुटुंबाच्या तक्रारीनुसार कारखान्याचे संचालक आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रभाकर घार्गे, सहसंचालक मनोज घोरपडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संग्राम घोरपडे आणि त्यांच्या इतर कर्मचाऱ्यांवर वडूज पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी सहसंचालक मनोज घोरपडे यांच्यासह सहा जाणांना अटक केली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दिली.

नातेवाइकांचा आक्रमक पवित्रा

जगदीप थोरात यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या नातेवाइकांनी आक्रमक पवित्रा घेतला. जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेतल्याने रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले. रात्री उशिरा थोरात यांचा मृतदेह वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. त्यानंतर पोलिसांनी थोरात यांच्या नातेवाइकांची समजूत घातली. त्यानंतर नातेवाइकांनी रात्री उशिरा थोरात यांचा मृतदेह ताब्यात घेऊन त्यांच्यावर गोवारे येथे अंत्यसंस्कार केले.