#PulwamaAttack : आत्मघाती हल्लेखोर आदिल दारच्या कुटुंबीयांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

श्रीनगर : पोलीसनामा ऑनलाईन – पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर भीषण आत्मघाती हल्ला झाला. या हल्ल्यात 44 पेक्षा जास्त जवान शहीद झाले तर, अनेक जवान गंभीर जखमी झाले. आदिल अहमद दार असं हा हल्ला घडवून आणणाऱ्या आत्मघाती हल्लेखोराचे नाव आहे. त्याच्या या कृत्यामुळे त्याच्या कुटुंबाला धक्का बसला आहे. यावर त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मुलाने केलेल्या कृत्याची लाज वाटते असे आदिलच्या कुटुंबियानी म्हटलं आहे.
पुलवामा येथील आत्मघाती ह्ल्ला घडवून आणणार आदिल अहमद दार हा काश्मीरमधील एका गावातील रहिवासी होता. त्याने केलेल्या कृत्याबद्दल त्याचा नातेवाईक अब्दुल रशिद आपली प्रतिक्रिया दिली आहे. अब्दुल रशिद म्हणला की, ”कुठल्याही व्यक्तीचा अशाप्रकारे मृत्यू झाल्यावर कुणाला आनंद होईल. आदिल याने लहानपणीच आपले शिक्षण सोडले होते. तो मोलमजुरी करत असे. गेल्यावर्ष मार्च महिन्यात तो भाऊ समीर दारसह मित्रांना भेटायला जातो असे सांगून, बेपत्ता झाला. त्यानंतर तो घरी परतलाच नाही. त्याच्या आई-वडलांनी पोलिसांत माहिती दिली होती. तसेच दहशतवादाचा मार्ग सोडून परत येण्याचे आवाहनही केले होते. मात्र तो माघारी फिरला नाही.”

आदिलच्या आणखी एका नातेवाईकाने याबाबत बोलताना सांगितले की, “आदिल हा एवढा कट्टर दहशतवादी बनेल असे वाटले नव्हते. 2016 मध्ये बुऱ्हाण वानीच्या मृत्यूनंतर दगडफेक करत असताना त्याच्या पायात पेलेट गनची गोळी लागली होती. त्यानंतर तो दहशतवादाकडे वळला.”

असा झाला हल्ला
जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 पेक्षा जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला. देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते. जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.