दीपक मानकरांवर पुरवणी दोषारोपपत्र

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – जितेंद्र जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक व  माजी महापौर दीपक मानकर आणि बांधकाम व्यावसायिक सुधीर कर्नाटकी यांच्यावर मोक्कांतर्गत दाखल गुन्ह्यात पुणे पोलिसांनी पुरवणी दोषारोपपत्र दाखल केले आहे.

जितेंद्र जगताप यांच्या आत्महत्येप्रकरणी दीपक मानकर आणि सुधीर कर्नाटकी यांच्यासह इतर आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी आधी विनोद भोळे, सुधीर सुतार, उत्तम तनपुरे, अतुल पवार, विशांत कांबळे, नाना कुदळे, अजय कंधारे यांना अटक केलेली आहे. जगताप यांचा मुलगा जयेश जगताप याने यासंदर्भात फिर्याद दिली होती. दीपक मानकर यांनी अटकपुर्व जामीनासाठी शिवाजीनगर न्यायालयात अर्ज केला होता. तो न्यायालयाने फेटाळला. त्यांनी उच्च न्यायालय त्यानंतर सर्वोच्च न्यायालयातही अर्ज केला. मात्र सर्वोच्च न्यायालयाने तो फेटाळत त्यांना दहा दिवसात पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर १ ऑगस्ट रोजी दीपक मानकर यांना पोलिसांनी अटक केली. तर सुधीर कर्नाटकी यांना उच्च न्यायालयाने अटकपुर्व जामीन मंजूर केला आहे.

दीपक मानकर यांच्यावर संघटित गुन्हेगारी विरोधी कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई केली. यापुर्वी पोलिसांनी अटक केलेल्या आठ जणांबाबत दोषारोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर दीपक मानकर यांच्यावर दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी पोलिसांनी दोन वेळा ४५- ४५ दिवसांची मुदतवाढही घेतली होती. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी पुरवणी दोषारोपपत्र गुरुवारी दाखल केले.

पुन्हा बाळासाहेब ठाकरे बनणं अशक्य