SC ने ऑक्सिजन पुरवठ्यावरून मोदी सरकारला फटकारले, म्हणाले – ‘आम्हाला कठोर निर्णय घेण्यास भाग पाडू नका’

पोलीसनामा ऑनलाइन – राजधानी दिल्लीत कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसागणिक रुग्णसंख्या वाढत असल्याने ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. केंद्राकडून दिल्ली सरकारला नुकतेच 700 मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा झाला होता. दिल्ली सरकारने आम्हाला रोज इतकाच ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा, अशी मागणी केली आहे. मात्र केंद्र सरकारने त्यास असमर्थता दर्शवली आहे. यावरुन सुप्रीम कोर्टाने केंद्राला गुरुवारी (दि.6) खडे बोल सुनावले आहेत. पुढील आदेशापर्यंत दिल्लीला रोज 700 मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा करावा असे आदेश न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहेत. तसेच यावेळी कोर्टाने आम्हाला सरकारविरोधात कठोर निर्णय घ्यावे लागतील, अशी परिस्थिती निर्माण करू नका अशा शब्दात फटकारले आहे.

न्यायमूर्ती चंद्रचूड म्हणाले की, दिल्लीला रोज 700 मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा पुढील आदेश येईपर्यंत झाला पाहिजे. ऑक्सिजनच्या पुरवठ्यावरुन सलग तिसऱ्या दिवशी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. दिल्लीला 700 टन प्राणवायू पुरवण्याच्या निर्देशांचे पालन न केल्याबद्दल केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांविरुद्ध दिल्ली उच्च न्यायालयाने सुरू केलेल्या अवमान कार्यवाहीला स्थगिती देतानाच सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला गुरुवारी सकाळपर्यंत त्याची बाजू मांडण्यास सांगितले होते.

दिल्ली सरकारचे वकील राहुल मेहरा यांनी कोर्टाला माहिती देताना म्हणाले की, मध्यरात्रीपर्यंत 527 मेट्रीक टन आणि सकाळी 9 वाजेपर्यंत 89 मेट्रिक टन ऑक्सिजन मिळाले आहे. दरम्यान सुप्रीम कोर्टाने प्रत्येक राज्याला ऑक्सिजनची किती गरज आहे हे जाणून घेण्यासाठी तज्ञांची समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला आहे.