काय सांगता …? मोदींच्या कार्यक्रमात निमंत्रण पत्रिकेवर सुप्रिया सुळेंची एंट्री…?

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – मेट्रो प्रकल्पाच्या भूमीपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी पुण्यात येत आहेत. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत आधी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावाचा समावेश करण्यात आला नव्हता. तशाच निमंत्रण पत्रिका प्रसार माध्यमांना देण्यात आल्या. स्थानिक खासदाराचं निमंत्रण पत्रिकेत नाव नसल्याबाबत आश्यर्य व्यक्त केले जात आहे. ही  बाब निदर्शनास आल्यानंतर नव्याने निमंत्रण पत्रिका तयार करण्यात आल्या आहेत.

पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन शहरांना जोडणाऱ्या तिसऱ्या आणि महत्त्वपूर्ण असलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाचं भूमीपूजन मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होईल. सुप्रिया सुळे यांच्या नावाचा उल्लेख नसलेल्या पत्रिका प्रसार माध्यमांना देण्यात आल्या. मात्र जिथे हा भूमीपूजनाचा कार्यक्रम होत आहे . ते बालेवाडी हे ठिकाण खासदार सुप्रिया सुळे यांच्या मतदारसंघात येतं. त्यामुळे प्रोटोकॉलनुसार त्यांना निमंत्रण का देण्यात आलं नाही, असा प्रश्न उपस्थित झाला.

स्थानिक खासदाराचं निमंत्रण पत्रिकेत नाव नसल्याबाबत विचारलं असता PMRDA चे आयुक्त किरण गित्ते यांनी आपल्या संगणकाचा स्क्रीन फोटो काढून दुसरी निमंत्रण पत्रिका पाठवली आहे. या नव्या पत्रिकेत खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावाचाही समावेश करण्यात आला आहे.

आता पीएमआरडीएच्या माध्यमातून साकारत असलेल्या हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने पंतप्रधान झाल्यानंतर चौथ्यांदा मोदी पुणे दौऱ्यावर येत आहेत. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत या दौऱ्याचा पक्षाला फायदा व्हावा, यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांकडून बारकाईने या दौऱ्याचे नियोजन सुरु आहे.

पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ हे चार लोकसभा आणि पुणे शहरातील आठ आणि पिंपरी-चिंचवडमधील तीन, असे अकरा विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना या कार्यक्रमात सहभागी करुन घेतले जाणार आहे. एवढी तयारी असतानाही मात्र स्थानिक खासदार निमंत्रण पत्रिकेत नाव नव्हतं. मात्र PMRDA ने अचानक केलेल्या या बदलानुसार दिलेल्या निमंत्रणाचा खासदार सुप्रिया सुळे स्वीकार करणार का, हे पहावे लागेल.