आता सूरीनामचे भारतीय वंशाचे राष्ट्रपती असणार प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे – सूत्र

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   26 जानेवारी रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनी(Republic Day of India) परेडमध्ये सूरीनाम प्रजासत्ताकचे अध्यक्ष चंद्रिकाप्रसाद संतोखी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. पंतप्रधान कार्यालयाशी संबंधित सूत्रांनी याची पुष्टी केली की, भारतीय वंशाचे संतोखी राजपथ परेडमध्ये सहभागी होतील. दरम्यान, ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन हे प्रमुख पाहुणे म्हणून प्रजासत्ताक दिनाच्या परेडला उपस्थित राहणार होते, पण त्यांनी ब्रिटनमधील कोरोनाव्हायरस न्यू स्ट्रेनच्या वाढीव प्रादुर्भावामुळे त्यांचा भारत दौरा रद्द केला. यानंतर, सूरीनामच्या अध्यक्षांना सरकारने आमंत्रित केले होते, जे त्यांनी आनंदाने स्वीकारले.

सुरिनामचे अध्यक्ष चंद्रिका प्रसाद संतोखी यांनी याआधी शनिवारी प्रवासी भारतीय दिनी हजेरी लावली होती. तेथे त्यांनी त्यांचा देश आणि भारत यांच्यातील लोकांच्या मुक्त हालचालीचा प्रस्ताव ठेवला होता. यासह त्यांनी द्विपक्षीय व्यापार आणि सांस्कृतिक संबंध दृढ करण्यासाठी पाठिंबा दर्शविला.

सुरिनामच्या भारतीय वंशाच्या अध्यक्षांनी प्रवासी भारतीय दिवसाच्या माध्यमातून डिजिटल पद्धतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात म्हटले की, “सुरिनाम भारतातून येणार्‍या प्रवाश्यांसाठी व्हिसा परवानग्या रद्द करून या दिशेने पहिले पाऊल उचलण्यास तयार आहे.” ते म्हणाले की, व्यापार आणि पर्यटन क्षेत्रात दोन्ही देशांमधील सहकार्य वाढविण्यासही वाव आहे.