संपामध्ये सहभागी झालेल्या एसटीच्या ११४८ कर्मचाऱ्यांचे निलंबन

 मुंबईः पोलीसनामा आॅनलाईन
आपल्या विविध मागण्यासाठी राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आठ आणि नऊ जूनला अघोषित संप पुकारला होता. या संपामध्ये सहभागी झालेल्या 1148 कर्मचाऱ्यांना एसटी प्रशासनाने निलंबित केलं आहे.
एसटी प्रशासनाच्या या निर्णयामुळे नव्याने सेवेत भरती झालेल्या अनेक तरुणांना आपली नोकरी गमवावी लागणार आहे. शिवसेनेचे नेते दिवाकर रावते यांच्याकडे सध्या राज्याचे परिवहन खाते आहे. वेतनवाढीसह अन्य मागण्यासांठी एसटीच्या कर्मचाऱ्यांकडून दोन दिवसांचा अघोषित संप पुकारण्यात आला होता. यावेळी 372 कर्मचाऱ्यांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल झाले आहेत.
तसेच संपाच्या कालावधीत दोन दिवसांत 93 बस गाड्यांचे नुकसानही करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये 19 नव्याने एसटीमध्ये सहभागी झालेल्या शिवशाही बस गाड्यांचा समावेश आहे. या संपामध्ये एसटीला मोठ्या प्रमाणात आर्थिक तोटा देखील सहन करावा लागला आहे. यावेळी एसटीचा 33 कोटी रुपयांचा महसूलही बुडाला. संप मागे घेण्यासाठी ९ जून रोजी एसटी महामंडळ आणि महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेसह, अन्य संघटनांची बैठक झाली. यात वेतनवाढसंदर्भातील मागणी मान्य झाल्यानंतर संप मागे घेण्यात आला.