कलयुग ! 3.5 कोटींच्या विम्यासाठी पत्नीनं 62 वर्षीय पतीला जिवंत जाळलं; भारतात घडलेली धक्कादायक घटना

चेन्नई : पोलीसनामा ऑनलाइन –   3.5 कोटींच्या विम्याची रक्कम मिळावी म्हणून पत्नीने चक्क स्वत:च्या 62 वर्षांच्या पतीला जिवंत जाळलं आहे. तामिळनाडूतील इरोडमध्ये शुक्रवारी (दि. 9) सकाळी ही धक्कादायक घटना उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी संबधित महिलेसह तिच्या साथीदाराला बेडया ठोकल्या आहेत.

रंगराज असे या प्रकरणात मृत्यू झालेल्याचे नाव आहे. तर त्याची पत्नी जोथिमनी (वय 57) आणि त्यांचा नातेवाईक राजा (वय 51) असे अटक केलेल्यांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रंगराज यांचा 13 मार्च रोजी अपघात झाला होता. त्यामुळे त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. त्यांना गुरुवारी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. मात्र ते चालू शकत नव्हते. त्यामुळे जोथिमनी आणि राजा हे त्यांना कारमध्ये घेऊन हॉस्पिटलच्या बाहेर पडले. राजा कार चालवत होता. तिरुपूर जिल्ह्यातील वालसुपालयम गावानजीक राजाने कार थांबवली. राजा आणि जोथिमनी कारमधून खाली उतरले आणि त्यांनी पेट्रोल टाकून कारला आग लावली. कारला आग लावताच रंगराज ओरडू लागले, पण कारच्या काचा बंद असल्याने त्यांचा आवाज बाहेर आला नाही. काही वेळातच कार आणि रंगराज हे दोघंही जळून खाक झाले. शुक्रवारी सकाळी राजानं तिरुपूर पोलीस ठाण्यात कार जळाल्याची सूचना दिली. त्यांनी ही हत्या म्हणजे अपघात असल्याचा बनाव केला. या प्रकरणात पोलिसांनी जोथिमनी आणि राजाचा जबाब घेतला. त्यात त्यांना विसंगती आढळून आली. त्यानंतर या रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले. त्यावेळी एका पेट्रोल पंपामधून राजा पेट्रोलच कॅन घेऊन येत असलेल्या दिसला. त्यानंतर पोलिसांनी कसून चौकशी केली असता दोघांनी त्यांचा गुन्हा कबूल केला. यासाठी जोथिमनीने राजाला दीड लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. त्यातील 50 हजार रुपये अगोदरच दिले होते.