तमिळनाडूत फटाक्याच्या कारखान्याला भीषण आग; 11 जणांचा मृत्यू

चेन्नई : पोलीसनामा ऑनलाइन  –   तमिळनाडूच्या विरुधनगर येथे फटाक्याच्या कारखान्याला आग लागल्याने मोठी दुर्घटना घडली. या आगीत आत्तापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला असून, यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. यातील चार जणांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दु:ख व्यक्त केले.

विरूधुनगरच्या एका फटाक्याचा कारखान्याला भीषण आग लागली. या आगीत कारखान्यातील काही कामगारांचा मृत्यू झाला. तर चार जण जखमी झाले. त्यांना आता रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अर्धा डझनपेक्षा जास्त गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. सध्या आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न केले जात आहे. मात्र, याच फटाक्याच्या कारखान्यात अद्याप अनेकवेळा स्फोट होत आहेत. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळविण्यात अडचणी येत आहेत.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले. त्यामध्ये त्यांनी ट्विट करून म्हटले, ‘तमिळनाडूच्या विरुधुनगर येथे एका फटाक्याच्या कारखान्याला आग लागल्याचे समजले. त्यामुळे खूप दु:ख झाले. या दु:खाच्या वेळी मी या दुर्घटनेतील पीडितांच्या कुटुंबियांचे सांत्वन करतो. तसेच जे यामध्ये जखमी आहेत, ते लवकरच बरे व्हावेत, अशी इच्छा व्यक्त करतो. या दुर्घटनेतील बाधितांच्या मदतीसाठी प्रशासन काम करत आहे.

मृतांच्या कुटुंबियांना 2 लाखांची मदत

PMNRF च्या माध्यमातून मृतांच्या कुटुंबियांना 2 लाख तर यामध्ये गंभीररित्या जखमी झालेल्या लोकांना 50 हजार रुपये देण्याचे पंतप्रधानांनी जाहीर केले.