सिंहगडावर मिळाली छत्रपतींच्या स्वराज्याच्या शिलेदाराची देहसमाधी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – नरवीर तानाजी मालुसरे यांची देह समाधी मिळाली आहे. तानाजी मालुसरे यांच्या सिंहगडावरील समाधी व पुतळा परिसराचे महापालिकेच्यावतीने सुशोभिकरण करत असताना ही देह समाधी मिळाली आहे. महापालिकेच्यावतीने पुरातत्व विभागाकडून हे काम सुरु आहे. त्यांच्या या देह समाधीच्या रुपाने प्रथमच शिवरायांच्या काळातील एक ऐतिहासिक ठेवा राज्याला मिळाला आहे. नरवीर तानाजी मालुसरे हे सिंहगडावर धारातीर्थी पडले. त्यांच्या बलिदानानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी ती समाधी बांधली आहे. विशेष म्हणजे या समाधीला छत्रपतींचा स्पर्शदेखील झाला आहे. त्या ठिकाणी नरवीरांनी देह सोडला. म्हणून तिला धारातीर्थ किंवा देह समाधी म्हणतात.
सध्या वन विभागाच्या परवानगीने पुणे महापालिकेच्या वतीने सिंहगडावर नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पुतळा, समाधीस्थळाचे सुशोभीकरण आणि स्वराज्य निष्ठा शिल्पाचे काम सुरू आहे. दरम्यान यातील स्वराज्य निष्ठा शिल्पाचे काम पूर्ण झाले आहे. या कामामध्ये पुतळ्यावरील मेघडंबरी मोडकळीस आल्याने ब्राँझ धातूची मेघडंबरी करणे. मेघडंबरीत पुतळ्याशेजारील समाधी आणण्याचे महापालिकेचे नियोजन होते.

काँक्रीट चौथरा काढून तेथे दगडी बांधकामातील चौथरा बांधण्याचे नियोजन होते. यासाठी पुतळा बाजूला काढून ठेवण्यात आला. त्याच्या काँक्रीटचा ठोकळा काढल्यानंतर त्याच्या खाली एक चौकोनी दगड होता. त्याखाली समाधीचे वृंदावन सापडले. याशिवाय पुतळ्याच्या बाजूलाच एका चौकाेनी दगडावर समाधीचा शिरोभाग दिसून आला. समोर आलेल्या माहितीनुसार, ती आज तागायत ही नरवीर तानाजी मालुसरे यांची समाधी म्हणून ओळखली जात होती. वृंदावन व त्यावरील चौकोनी दगड व त्यावर शिरोभाग अशी जोडणी केल्यावर ही नरवीर तानाजी मालुसरे यांनी मुळ समाधी असल्याचे दिसून आले आहे.

मराठा समाजाला राज्यात आर्थिक आरक्षणाचा लाभ नाही 

“स्वातंत्र्यापूर्वीच्या एका इंग्रजी पुस्तकात अशा प्रकारे समाधीचा फोटो आहे. त्यामुळे ही नरवीरांची समाधी आहे.” असे इतिहास अभ्यासक पांडूरंग बलकवडे यांनी सांगितले.
सध्या समाधी परिसराचे काम सुरु असल्याने परिसर बंद आहे. परंतु नरवीरांच्या पुण्यतिथीपूर्वी आम्ही समाधी परिसर खुला करू. काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना अधीक्षक अभियंता शिवाजी लंके, उपअभियंता सुनील मोहिते यांना दिल्या आहेत. असे पालिकेचे विरोधी पक्ष नेते दिलीप बराटे यांनी सांगितले.  तिथीनुसार नरवीरांची पुण्यतिथी 27फेब्रुवारी 2019 रोजी आहे. सहायक संचालक विलास वाहने  समाधी व परिसराची पाहणी केल्यानंतर समाधी दिसल्यामुळे पुतळा येथे बसविणे योग्य नाही असे सूचविले. पुरातत्व च्या सूचनेनुसार ब्राँझ पुतळा बसविणार आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्यामुळे सुमारे सहा कोटींचा निधी पालिका हद्दीबाहेर वापरता आला.
नरवीरांच्या पराक्रमाची साक्ष
नरवीर तानाजी मालुसरे यांच्या वंशज असणाऱ्या  शीतल मालुसरे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, “नरवीर धारातीर्थी पडले ते स्फूर्तीस्थळ मालुसरे यामच्या 349व्या पुण्यतीथीच्या अगोदर उजेडात आले. ही त्यांच्या पराक्रमाची साक्ष आहे. छत्रपती शिवरायांनी स्वतः ही समाधी बांधून घेतली. पूर्ण झाल्यावर समाधीचे दर्शन घेतले आहे. राजे व मावळ्यांची एकमेकांशी असलेली निष्ठा या समाधीमुळे अधिक दृढ झाली. मालुसरे यांच्या मृत शरीराला उमरठ येथे अग्नी दिला त्या ठिकाणी अग्नी समाधी आहे.”