‘तान्हाजी’ Review : सरस ‘तंत्रज्ञान’, दमदार ‘संवाद’ आणि अभिनय… एकंदरीत डोळ्याचं ‘पारणं’ फेडणारा सिनेमा !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – तान्हाजी : द अनसंग वॉरियर हा सिनेमा आज(शुक्रवार दि 10 जानेवारी) सर्वत्र रिलीज झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा वीर योद्धा आणि मावळा तान्हाजी मालुसरे यांच्या आयुष्यावर आधारीत हा सिनेमा आहे. कोंढाणा जिंकण्यासाठी त्यांनी कशी जीवाची बाजी लावली हा सगळा प्रवास आणि ते युद्ध सिनेमात पहायला मिळत आहे. बॉलिवूडमध्ये आजवर बनलेल्या अनेक ऐतिहासिक सिनेमात तांत्रिकदृष्ट्या हा सिनेमा उजवा ठरतो.

छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघल सरदार मिर्झा राजे जयसिंगसोबत झालेल्या पुरंदरच्या तहात एकूण 23 किल्ले मुघलांच्या स्वाधीन केले होते. हा किल्ला मिळेपर्यंत वाहना घालणार असा निश्चय राजमाता जिजाऊ करतात. औरंगजेब उदयभान राठोड याला कोंढाण्याचा सरदार म्हणून पाठवतो. हा किल्ला परत मिळवण्यासाठी छत्रपती  शिवाजी महाराज आपला लाडका मित्र आणि शूर मावळा तान्हाजी मालुसरेला या मोहिमेसाठी पाठवतात. हा सगळा प्रवास सिनेमात पहायला मिळणार आहे.

तान्हाजी सिनेमात वापरलेलं CGI तंत्रज्ञान ही या सिनेमाची जमेची बाजू आहे. याआधीही बॉलिवूडमधील अनेक सिनेमात हे तंत्रज्ञान वापरले आहे. परंतु या सिनेमातील त्याचा वापर मात्र सरस ठरला आहे. सिनेमाचा सेट, रंगभूषा, वेशभूषा ही चांगली जमली आहे. सिनेमॅटोग्राफी कृत्रिम असली तरी तो काळ उभा करण्यात सिनेमाला यश आलं आहे. हा सिनेमा म्हणजे प्रेक्षकांसाठी एक पर्वणीच आहे.

सिनेमात सर्वच कलाकारांनी उत्कृष्ट भूमिका साकारली आहे. अजय देवगण, काजोल, देवदत्त नागे, शरद केळकर सर्वांनीच प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. सैफ अली खाननेदेखील बाजी मारली आहे. त्याच्या करिअरमधील ही सर्वात उत्कृष्ट भूमिका आहे असं म्हटलं तरी चालेल. कारण उदयभानचा वेडसरपणा आणि त्याची हिंसक वृत्ती सगळं काही त्याने उत्तम साकारलं आहे.

मध्यांतरापूर्वी सिनेमा काहीसा संथ वाटू शकतो. परंतु मध्यांतरानंतर सुरु झालेलं युद्ध मात्र सर्वांनाच खिळवून धरतं. उदयभानला भेटण्यासाठी तान्हाजी मालुसरे कोंढाण्यावर जातात तेव्हा त्यांनी केलेलं नृत्य ही सिनेमॅटीक लिबर्टी खटकते. दिग्दर्शक ओम राऊतचा हा पहिलाच हिंदी सिनेमा असला तरी दिग्दर्शनात कुठेच कमतरता भासत नाही.

या सिनेमातील अ‍ॅक्शन सीन पाहताना लक्षात येतं की सिनेमाच्या टीमने तलवारबाज आणि देहबोलीवर प्रचंड मेहनत घेतली आहे. सिनेमातील दमदार संवाद लक्ष वेधून घेतात. याशिवाय बॅकग्राऊंड स्कोरचे तर करावे तितके कौतुक कमीच आहे. तान्हाजी मालुसरे धारातीर्थी पडल्यानंतर शिवाजी महाराजांच्या तोंडून आलेला संवाद गड आला पण सिंह गेला ऐकल्यानंतर अक्षरश: डोळ्यात पाणी उभं राहतं. तान्हाजी मालुसरे या शूर मावळ्याची कथा सिनेमागृहात जाऊन नक्की पहा.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/