पुन्हा अडचणीत ‘तनिष्क’, आता दिवाळीशी संबंधित जाहिरात मागे घ्यावी लागली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टाटा समूहाची कंपनी टायटनचा ज्वेलरी ब्रँड तनिष्कचे दिवस सध्या खराब असल्याचे दिसत आहे. कथित ’लव जिहाद’वर धार्मिक कट्टरतावाद्यांनी मोठा गदारोळ केल्याने ’एकत्वम’ अभियानाची एक अ‍ॅड हटवावी लागल्यानंतर तनिष्कला आता दिवाळीचीसुद्धा जाहिरात सोशल मीडियावरील विरोधामुळे मागे घ्यावी लागली आहे.

या अ‍ॅडमध्ये मॉडल सयानी गुप्ता असे बोलताना दिसत आहे की, ती दिवाळी फटाके वाजवण्याऐवजी काही वेळ आपल्या आईसोबत घालवणे पसंत करेल. पुन्हा एकदा एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करणार्‍या तनिष्कच्या या अ‍ॅडवरसुद्धा सोशल मीडियावर धार्मिक कट्टरतावाद्यांनी मोठी नाराजी व्यक्त केली.

काय आहे जाहिरातीत
’एकत्वम’ कॅम्पेन अंतर्गत जारी या जाहिरातीत नीना गुप्ता, सयानी गुप्ता, निमरत कौर आणि अलाया फर्निचरवाला यांनी काम केले आहे. त्या आपसात बोलताना दिसत आहेत की, या दिवाळीला काय करणार. सयानी गुप्ता म्हणते की, ती फटाके नाही वाजवणार, आणि त्याऐवजी आपल्या आईसोबत काही वेळ घालवणे पसंत करेल.

सोशल मीडियावर नाराजी
परंतु, सोशल मीडियावर या अ‍ॅडच्या विरुद्ध मोठा संताप व्यक्त करण्यात आला आणि यास हिंदूंच्या परंपरेवर हल्ला म्हटले गेले.

यापूर्वी सणांसाठी तनिष्कने हिंदू मुलीचे मुस्लीम कुटुंबात लग्नासंबंधी एक अ‍ॅड व्हिडिओ जारी केला होता, परंतु तो त्यांच्यासाठी अडचणीचे कारण ठरला. व्हिडिओ समोर येताच लोकांनी सोशल मीडियावर त्यास विरोध केला. लोकांनी यास कथित लव जिहादला प्रोत्साहन देणारे म्हटले.

धार्मिक कट्टरतावाद्यांच्या विरोध पाहता तनिष्कला ही जाहिरात नाईलाजाने हटवावी लागली होती. मात्र, याचे समर्थन करणारेसुद्धा असंख्य लोक मैदानात उतरले होते. परंतु कंपनीवर दबाव वाढला. यावर काँग्रेस खासदार शशी थरुर म्हणाले होते की, हिंदुत्वाच्या कट्टरतावाद्यांनी तनिष्क ज्वेलरीवर बहिष्काराचे आवाहन केले आहे. जर हिंदू-मुस्लीम हिंदू- मुस्लीम एकता त्यांना अस्वस्थ करत असेल, तर त्यांनी जगातील सर्वात दीर्घकाळ जिवंत राहणार्‍या हिंदू-मुस्लीम एकतेचे प्रतीक-भारताचा बहिष्कार का नाही करत.