मी-टू प्रकरण : नाना पाटेकर यांच्या संदर्भातील ‘ते’ वृत्त खोटे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेत्री तनुश्री दत्ता यांच्या कथित लैंगिक छळ केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना क्लिन चिट दिल्याच्या सोशल मीडियावर पोस्ट फिरत होत्या. मात्र, त्या अफवा असून या प्रकरणात नाना पाटेकर यांना क्लिनचिट मिळालेली नाही, असे ओशिवरा पोलिसांनी सांगितले.

‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटाच्या सेटवर नाना पाटेकर यांच्यासह दिग्दर्शक राकेश सारंग, कोरिओग्राफर गणेश आचार्य यांनी लैंगिक छळ केल्याचा आरोप तनुश्री दत्त हिने करुन एकच खळबळ उडवून दिली होती. या प्रकरणाच्या घटनेशी साधर्म्य साधणारा जबाब कोणीही न नोंदविल्याने पोलिसांनी नाना पाटेकर यांना क्लिनचिट दिल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर फिरत होत्या. बॉलिवूडशी संबधित एका वेबसाईटने या बाबतच्या रिपोर्टमध्ये क्लिनचिट दिल्याचा दावा केला होता.

‘हॉर्न ओके प्लीज’ चित्रपटाच्या सेटवर २००८ साली अभिनेते नाना पाटेकर यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप तनुश्री दत्ताने गेल्या वर्षी केला होता. सिनेमाच्या एका स्पेशल गाण्याचे शुटिंग सुरु होते. त्यावेळी नाना पाटेकर यांनी मला बाहुपाशात घेतले. कोरिओग्राफर्सना दूर व्हायला सांगून डान्स कसा करावा, हे ते मला दाखवत होते, असा दावा तनुश्रीने केला होता.
तनुश्री दत्ताने केलेल्या आरोपांबद्दल पोलिसांनी १५ जणांचे जबाब नोंदवून घेतले. त्यापैकी एकानेही दशकभरापूर्वी झालेल्या या लैंगिक छळाला दुजोरा दिला नसल्याचे या रिपोर्टमध्ये पोलिसांनी म्हटल्याचे सांगण्यात येत होते. अभिनेत्री डेझी शाह हिचाही जबाब नोंदविण्यात आला होता.

दरम्यान, या प्रकरणी चौकशी सुरू आहे. पोलिसांचा तपास सुरू असतानाच आज नाना पाटेकरांना क्लीन चिटच्या अफवा सोशल मीडियावर पसरल्या होत्या. या प्रकरणात कोणालाही क्लीन चिट दिली नसल्याचे परिमंडळ 9चे पोलीस उपायुक्त परमजीतसिंग दहिया यांनी सांगितले.