‘मुंबईची भाषा मराठीच’, ‘तारक मेहता’मधील अमित भटनं मागितली जाहीर माफी

पोलीसनामा ऑनलाइन टीम – तारक मेहता का उल्टा चष्मा या प्रसिद्ध मालिकेत मुंबईची भाषा हिंदी असल्याचं दाखवण्यात आल्यानं नवा वाद निर्माण झाला होता. मालिकेतील ॲक्टर अमित भट यानं या प्रकरणी जाहीर माफी मागितली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी तारक मेहतामधील अलीकडेच प्रसारीत झालेल्या मालिकेचा व्हिडीओ शेअर करत संताप व्यक्त केला होता. त्यांनी ट्विट करत आपला राग व्यक्त केला होता.

मुंबईची भाषा हिंदी असं तारक मेहतामध्ये दाखवल्यानं नवा वाद झाला होता. या मालिकेत चंपकचाचाची भूमिका साकारणाऱ्या अमित भटनं एका पत्रकाद्वारे जाहीर माफी मागितली आहे. अमित म्हणतो, “मी अमित भट तारक मेहात का उल्टा चष्मा मालिकेत काम करतो. मी चंपक चाचाची भूमिका साकारतो आहे. मी अभिनय करताना लेखकानं दिलेले संवाद बोलताना मुंबई येथील भाषा हिंदी आहे असं माझ्याकडून चुकून बोललं गेलं आहे. कारण स्क्रिप्टमध्ये तसे शब्द होते. मुंबई येथील भाषा हिंदी नसून मराठी आहे आणि मला त्याचा अभिमान आहे. झालेल्या चुकीबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि माफी मागतो. यापुढं अशी चूक होणार नाही याची मी दखल घेईन. वरील बाब समजून घेऊन आपण मला माफ कराल ही विनंती” असं अमितनं आपल्या माफीनाम्यात म्हटलं आहे.