TCS नं स्थानिकांना रोजगार द्यावा, केंद्रीय मंत्री गडकरी यांची अधिकाऱ्यांना सूचना

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची आणि नावाजलेलली कंपनी टीसीएसने (Tata Consultancy Services ) आपल्या व्यवसायाची विस्तार योजना जारी केली असून आज केंद्रीय महामार्ग वाहतूक परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांना कंपनीच्या अधिका-यांनी हजारो तरुणांंना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. टीसीएसच्या मानव संसाधन विभागाचे प्रमुख हर्षल गजघाटे आणि रेवती मुलमुले यांनी या विस्तार योजनेची माहिती दिली.

या योजनेमुळे आगामी काळात हजारो सुशिक्षित युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. प्रारंभी मिहान प्रकल्पात टीसीएस या कंपनीने 50 एकर जागा खरेदी करून आपला प्लॉंट सुरु केला आहे. आता आणखी 50 एकर जागा घेऊन 103 एकरवर काम सुरु आहे. नव्या विस्तार योजनेसाठी कंपनीने मोठी गुंतवणूक केली असल्याचे गजघाटे यांनी गडकरी यांना सांगितले.

कंपनीच्या अधिका-यांशी चर्चा करताना गडकरी म्हणाले, नागपुरात नियुक्त्या करताना स्थानिक बेरोजगार तरुणांना नोक-यामध्ये प्राधान्य द्यावे. नागपूर, विदर्भात मोठ्या प्रमाणात सुशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध आहे. आयटी, बिगर आयटी तसेच व्यवस्थापनाच्या क्षेत्रात नागपूरसह विदर्भातील युवकांना न्याय दिला पाहिजे, अशी सूचना त्यांनी केली. टीसीएसची ही विसातर योजना तीन वर्षात पूर्ण होणार असून त्यात विदर्भातील युकांना रोजगार उपलब्ध होतील, असा विश्वास टीसीएसच्या अधिका-यांनी व्यक्त केला आहे.