‘त्या’ शिक्षिकेकडून हरवल्या चक्क SSC बोर्डाच्या उत्तरपत्रिका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – नवी मुंबई येथे एका शिक्षिकेकडून अजब गोष्ट घडली आहे. विवेकानंद इंग्लिश स्कुल शाळेतील शिक्षिकेकडून चक्क SSC बोर्डाच्या इंग्रजी विषयाच्या उत्तरपत्रिका हरवल्या आहेत. SSC च्या फेरपरीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांच्या या उत्तरपत्रिका आहेत. इंग्रजी शाळेत शिकवणाऱ्या या शिक्षिका रिक्षात उत्तरपत्रिका विसरल्या. ही घटना १२ मार्चला घडली असली तरी याबाबतची तक्रार १५ मार्चला नोंदवण्यात आली आहे.

नक्की काय घडले ?

उत्तरपत्रिका शाळेमध्ये तपासल्यानंतर शिक्षिकेकडे उत्तरपत्रिकांचा गठ्ठा वाशी येथील एसएससी बोर्डाच्या कार्यालयात नेऊन देण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. शिक्षिका तपासलेल्या उत्तरपत्रिकाचा गठ्ठा घेऊन जमा करण्यासाठी वाशी येथील बोर्डाच्या कार्यालयात येत होत्या. त्यावेळी रिक्षा प्रवासात सात उत्तरपत्रिका गहाळ झाल्या असे रबाळे एमआयडीसी पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक नितीन गीते यांनी सांगितले.

त्या विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय ?

ऐरोली येथे राहणाऱ्या शिक्षिकेने तीन दिवस आपल्यापरीने या उत्तरपत्रिका शोधण्याचा प्रयत्न केला. पण जेव्हा उत्तरपत्रिका कुठेच सापडल्या नाहीत तेव्हा त्या १५ मार्चला पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्यासाठी आल्या.  प्रथमदर्शनी यामध्ये कुठलाही गैरप्रकार आढळलेला नाही.  आम्ही पेपर हरवल्याची तक्रार नोंदवली आहे. असे नितीन गीते यांनी सांगितले. एसएससी बोर्डाच्या विभागीय कार्यालयाकडून चौकशी सुरु करण्यात आली असून, शिक्षिकेकडून स्पष्टीकरण मागितले आहे. दरम्यान ज्या विद्यर्थ्यांची उत्तरपत्रिका गायब झाली आहे त्यांच्या निकालाचे काय होणार ? त्यांच्या भविष्याचे काय ? हा मात्र विचार करण्यासारखा विषय आहे.