शिक्षक पुरस्कार : आदिवासी भागात काम करणाऱ्या शिक्षकांवर अन्याय

पुणे : पोलीसनामा

यंदाही आदिवासी भागात ज्ञानदानाचे काम करणाऱ्या शिक्षकांना जिल्हा शिक्षक पुरस्करातून वगळण्यात आल्याचा आरोप जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत करण्यात आला. शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी बद्दल दिल्या गेलेल्या शिक्षक पुरस्कार यादीत झालेली चूक शिवसेनेच्या गटनेत्या आशा बुचके यांनी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत निदर्शनास आणून दिली. शिक्षक दिनानिमित्त देण्यात येणाऱ्या जिल्हा शिक्षक पुरस्कार वितरणात वशिलेबाजी झाल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्यांनी यावेळी केला.

या सर्वसाधारण सभेला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील, महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती राणी शेळके, आरोग्य आणि बांधकाम विभागाचे सभापती प्रवीण माने, कृषी आणि पशुसंवर्धन विभागाच्या सभापती सुजाता पवार, समाजकल्याण विभागाच्या सभापती सुरेखा चौरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एन. मित्रगोत्री आदी उपस्थित होते.

जिल्हा परिषदेच्या शिवसेनेच्या आशा बुचके यांनी सर्वसाधारण सभेत याविषयावर आवाज उठवला. त्या म्हणाल्या, जिल्हा परिषदेच्यावतीने देण्यात आलेल्या शिक्षक पुरस्कारांमध्ये आदिवासी भागातील शिक्षकांना डावलण्यात आले आहे. त्यांच्यावर अन्याय झाला आहे. शिष्यवृत्ती परिक्षेत केवळ एकच विद्यार्थी उत्तीर्ण झालेला असताना इतर शिक्षकांचे विद्यार्थी स्वतःचे असल्याचे सांगून प्रशासनाची दिशाभूल करीत आहेत. आंबेगावमधील मोरडेवाडी शाळेतील एका शिक्षकाला पुरस्कार दिला असून त्याला यापूर्वी एकदा निलंबित करण्यात आले होते. त्यामुळे अधिकाऱ्यांशी शिक्षकांनी संगनमत करीत अफरातफर करणाऱ्या शिक्षकाला पुरस्कार देऊन त्यांची प्रतिमा उजळण्यात येत आहे. आशा बुचके यांनी हे प्रकार सभागृहात मांडल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी सदस्यांनी केली. यासंदर्भात चौकशी करून दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येईल. तसेच आदिवासी भागातील शिक्षक पुरस्कारांच्या संदर्भात पुढील वर्षी दखल घेतली जाईल, असे आश्वासन उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील यांनी सभागृहात दिले.