टेंभू उपसा जलसिंचन योजनेची कामे प्रगतीपथावर

सांगली : पोलीसनामा आॅनलाइन – अखेर टेंभूच्या चौथ्या टप्प्यातून पाणी वेजेगाव तलावाकडे रवाना झाले. गेल्या महिनाअखेरीस टेंभूच्या या टप्प्याची सर्व कामे पूर्ण झाली तसेच या टप्प्यासाठी आवश्यक असणारी वीज यंत्रणाही कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे लेंगरे परिसरात प्रचंड आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे.

टेंभू उपसा जलसिंचन योजनेच्या तीन टप्प्यांची कामे पूर्ण झाली आहेत. आता चौथ्या आणि पाचव्या टप्प्यांची कामे प्रगतीपथावर आली आहेत. आज टप्पा क्रमांक 4 च्या पंप गृहाच्या एका पंपाद्वारे पाणी उचलून मादळमुटी कालव्यातून लेंगरे तलावाकडे सोडण्यात आले आहे. या पाण्याचा  लेंगरे, भुड, मादळ मुठी, वेजेगाव , वाळूज,  देवनगर, भांबर्डे, जोंधळखिंडी, वासुंबे या गावांना लाभ होणार आहे.

या बाबत टेंभूचे उपअभियंता मोहन गळगे म्हणाले, टेंभू योजनेच्या घाणंद एक्सप्रेस कालव्याला जोडून भरण कालव्यातून वेजेगाव पंपगृह टप्पा क्रमांक 4 कडे पाणी वळवण्यात आले आहे. याच भरण कालव्याला पोट कालवा काढून पाणी वेजेगाव तलावाकडे सोडले आहे,  तसेच या तलावकाठावरील असलेल्या चौथ्या टप्प्याच्या पंपगृहातून पाणी उचलून पुढे मादळमुटी कालव्याद्वारे पाचव्या टप्प्याकडे म्हणजे भूड येथील पंप ग्रहाकडे जात आहे. वाटेत असलेल्या मादळमुटी कालव्यातून पाणी लेंगरे तलावाकडे जात आहे. दरम्यान ही चाचणी असल्यामुळे कालव्याचा चेंबर लीक असल्याचे दिसतात सायंकाळी सात वाजेपर्यंत लिकेज काढण्यात आले, लेंगरे येथील तरुणांच्यात इतका प्रचंड उत्साह होता, की तरुणांनीच हे लिकेज काढण्यास मोलाची मदत केली, त्यानंतर पुन्हा चाचणी सुरू करताच यशस्वीपणे पाणी देवीखिंडी पंप हाऊस पासून दीड किलोमीटर पर्यंत गेल्यानंतर परिसरातील अनेक गावाच्या लोकांनी कॅनॉलकडे धाव घेतली.

लेंगरेसह पंचक्रोशीतील लोकांनी आपापल्या गावांत फटाके वाजवून आनंद साजरा केला, रात्री पंप बंद करण्यात आले ते उद्या सकाळी दहा वाजता पुन्हा सुरू करण्यात येणार असून, उद्या सायंकाळपर्यंत प्रत्यक्ष लेंगरे तलावात पाणी पोहचणार आहे, चौथ्या टप्प्याची चाचणी झाल्याने घाटमाथ्यावर मोठी उत्सुकता व आशा निर्माण झाली आहे.