बलात्कार प्रकरणातील आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – अश्‍लिल फोटो इंटरनेटवर टाकून बदनामी करण्याची भिती घालून बलात्कार केल्याबद्दल स्वप्नील सुनील गायकवाड (वय २५, रा.अंकलखोप, ता. पलूस) याला १० वर्षे सक्तमजुरी व ७ हजार रूपये दंडाची शिक्षा जिल्हा सत्र न्यायाधीश एस. एस. सापटनेकर यांनी सुनावली. सरकारपक्षातर्फे  सहाय्यक जिल्हा सरकारी वकील रियाज जमादार यांनी काम पाहिले.

खटल्याची  पार्श्‍वभूमी अशी पीडित मुलगी व आरोपी स्वप्नील एकाच भागात राहतात. आरोपी स्वप्नील हा पीडित मुलीच्या मागे फिरत होता. त्यानंतर मुलीच्या मैत्रिणीमार्फत तिला निरोप पाठवून प्रेमसंबंध  ठेवण्यास सांगितले. तरी देखील मुलीने त्याला दाद दिली नाही. त्यानंतर स्वप्नीलने मुलीच्या वडिलांना व भावाला मारण्याची धमकी दिली. त्यामुळे पीडित मुलगी घाबरून त्याला भेटण्यासाठी त्याच्या घरी मैत्रिणीबरोबर गेली.

तळेगाव दाभाडे (पुणे) | विनापरवाना पिस्टल बाळगणाऱ्यास अटक

स्वप्नीलने मैत्रिणीला घराबाहेर जाण्यास सांगून मुलीवर लैंगिक अत्याचार करून त्या कृत्याचे त्यांच्या मोबाईलवर रेकॉर्डींग केले. त्यानंतर स्वप्नील याने रेकॉर्डींग इंटरनेटवर टाकून बदनामी करण्याची धमकी देऊन तिच्यावर वारंवार बलात्कार केला. या त्रासाला कंटाळून पीडित मुलीने भिलवडी पोलिस ठाण्यात  स्वप्नील  विरूध्द फिर्याद  दिली. पोलिस निरीक्षक राजेंद्र मोरे यांनी तपास करून स्वप्नील विरूध्द आरोपपत्र दाखल केले.

या खटल्यात एकूण १२ साक्षीदार तपासण्यात आले. पीडित मुलीची साक्ष ग्राह्य धरून न्यायालयाने शिक्षा सुनावली. भा.द.वि.कलम 372(2) (आय) तसेच लैंगिक अत्याचारापासून बालकांचे सरंक्षण कायद्याअंतर्गत १० वर्षे सक्तमजुरी व ७ हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास १ महिना साधी कैदची जादा शिक्षा भोगण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

नाशिक | तुकाराम मुंढेंच्या ‘या’ प्रश्नांवर तरुण इंजिनिअर निरुत्तर