मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ विधानावरून महाविकासमध्ये असंतोष ?

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांनी बुधवारी विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना भाजपाच्या (BJP) नेत्यांच्या आरोपांवर प्रतिउत्तर दिले. तसेच हिंदुत्वाच्या मुद्द्यावरूनही मुख्यमंत्र्यांनी भाजपावर चौफेर हल्लाबोल केले होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी सभागृहामधून हिंदुत्व आणि बाबरी मशिदीबाबत (Babri Masjid) बोलणे शिवसेनेच्या महाविकास आघाडीमधील मित्रपक्षांना फारसे रुचलेले नाही. मुख्यमंत्री आता केवळ पक्षप्रमुख राहिलेले नाहीत. ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी बाबरी मशिदीबाबत केलेले विधान अयोग्य होते, अशी टीका महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी केले आहे. दरम्यान, काल विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वावरून विरोधी पक्ष असलेल्या भाजपावर घणाघाती टीका केली होती.

विधानसभा निवडणुकीआधी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शहा यांनी बंद दाराआड दिलेल्या वचनाच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुन्हा आक्रमक झालेले पाहायला मिळाले. “ज्या बाळासाहेबांची आठवण तुम्हाला आता होतेय. ज्या हिंदुत्वावर तुम्ही बोलत आहात. मग ज्या खोलीला आम्ही हिंदुत्वाचं मंदिर मानतो. त्या खोलीत अमित शहांनी दिलेलं वचन बाहेर आल्यावर तुम्ही निर्लज्जपणे नाकारता. याची लाज वाटायला हवी”, असं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले होते. तसेच “भाजपनं आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. तेवढी तुमची पात्रता नाही. ज्या बाळासाहेबांचा उल्लेख तुम्ही करत आहात. त्याचं हिंदुत्व हे काही शेंडी-जानव्याचं हिंदुत्व नव्हतं. बाबरी मशिदी पाडली गेली तेव्हा सर्व ‘येर गबाळे’ पळून गेले होते. एकटे बाळासाहेब आक्रमकपणे उभे राहिले होते. त्यामुळे भाजपनं हिंदुत्वाच्या गप्पा मारू नये. जम्मू-काश्मीरमध्ये युती करताना भाजपचं हिंदुत्व कुठं गेलं होतं?”, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला.