पोलीस आयुक्तांकडून शहरात अवैधपणे गुटखा विक्री करणाऱ्यावर जोरदार कारवाई केली सुरू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात अवैधपणे गुटखा विक्री करणाऱ्यावर पोलीस आयुक्तांनी जोरदार कारवाई सुरू केली असून, ३३ पथकांकडून शहराच्या विविध भागात छापे टाकण्यात आले आहेत. यामुळे गुटखा विक्रेते अन् डीलर यांचे धाबे दणाणले आहेत. या कारवाईत २३ गुन्हे दाखल करत १२ लाख २६ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला आहे.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शहरात अमली पदार्थ विक्री, गुटखा विक्री यासह अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर काही ठिकाणी कारवाई केल्यानंतर हडपसर, कोंढवा, वानवडी, फरासखाना, खडकी, विमानतळ, कोथरूड, वारजे, उत्तमनगर या परिसरातून अवैध गुटखा विक्री व वाहतूक होत असल्याबाबत माहिती आयुक्तांना मिळाली होती. त्यामुळे त्यांनी पुन्हा पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ३३ पथके तयार करून गुटखा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.

त्यानुसार या पोलीस ठाण्याच्या हददीत छापे टाकून २३ गुन्हे दाखल करत २९ आरोपींवर कारवाई करण्यात आली. या ठिकाणाहून १२ लाख २६ हजार ४६३ रुपये किमतीचा गुटखा, सिगारेट जप्त करण्यात आली आहे.

गेल्या महिन्यातदेखील गुटखा विक्री करणाऱ्यांची माहिती मिळाल्यानंतर विविध ठिकाणी कारवाई करत १२ गुन्हे दाखल करत १८ आरोपींवर कारवाई केली होती. त्यांच्याकडून २२ लाख २७ हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला होता. तसेच, गुन्हे शाखेने खराडी येथे गुटखा विक्रीवर कारवाई केल्यानंतर शहरात गुटख्याच्या पैशातून चालणारे मोठे हवाला रॅकेटदेखील नुकतेच उघडकीस आले आहे. या कारवाईमुळे अवैधपणे गुटखा व सिगारेट विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.