मंदिरातील दानपेट्या फोडणारा चोरटा अटकेत

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच रात्रीत महादेव मंदिर, तुळजाभवानी मंदिर अशा एकूण चार मंदिरातील दानपेट्या फोडून रोकड चोरणाऱ्या चोरट्यास सांगवी पोलिसांनी अटक केली आहे.

या प्रकरणी पुरुषोत्तम हरिभाऊ वाघमारे (४४, रा. भैरवनाथ मंदिराशेजारी, पिंपळे गुरव गावठाण) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे गुरव गावठाण येथे महादेव मंदिर आहे. त्या मंदिरात फिर्यादी पुरुषोत्तम वाघमारे पुजारी म्हणून काम करतात. गुरुवारी वाघमारे यांनी मंदिराचा दरवाजा बंद केला. रात्री अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून मंदिरात ठेवलेली दानपेटी फोडली. दानपेटी मध्ये असलेली सुमारे एक हजार रुपयांची रक्कम चोरटयांनी चोरून नेली.

महादेव मंदिराप्रमाणेच सांगवी परिसरातील इतर तीन मंदिरातील दानपेट्या फोडून रोकड चोरट्यानी चोरुन नेला होता. एकाच रात्री चार ठिकाणी दानपेट्या फोडल्याने घबराट निर्माण झाली होती. दरम्यान तपास सुरू असताना दानपेटी फोडणारा चोरटा लक्ष्मीनगर परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक मोहन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी पथकाचे सहाय्यक निरीक्षक योगेश आव्हाड आणि त्यांच्या पथकाने सापळा रचून अक्षय अनिल साळवे (२३, रा.पिंपळे गुरव, सांगवी) याला अटक केली. त्याच्याकडून चार दानपेटीतील एक लाख २३ हजार रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे.