११ वी ची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू ; १० वी चा ‘निकाल’ जूनच्या पहिल्या आठवड्यात

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – दहावीनंतर अनेक विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी अकरावीला प्रवेश घेण्याचा निर्णय घेतात. शिक्षणाचे माहेरघर असणाऱ्या पुण्यासारख्या ठिकाणी शिक्षण घेण्याची अनेकांची इच्छा असते. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील महाविद्यालयात अकरावीला प्रवेश घेण्यासाठी असलेली अर्ज प्रक्रिया आजपासून (27 मे) सुरू झाली आहे. कला, वाणिज्य,विज्ञान या शाखांसाठी ही प्रवेश प्रक्रिया असणार आहे. अकरावीला प्रवेश घेण्यासाठी अर्जाचे दोन भाग भरावे लागतात. त्यापैकी प्रवेशाचा एक भाग आता भरता येणार आहे. दुसरा भाग दहावीचा निकाल लागल्यानंतर भरायचा आहे.

अर्जाच्या पहिल्या भागात माहिती,पत्ता,संपर्क, अशी माहिती भरायची आहे तर दुसऱ्या भागात पसंतीच्या महाविद्यालयांचे पर्याय निवडायचे आहेत.

अर्ज कसा भराल?

जवळच्या महाविद्यालयातून प्रवेश प्रक्रियेसाठी लागणारी माहिती पुस्तिका खरेदी करा.

माहिती पुस्तिकेत दिलेली वेबसाईट उघडा.

माहिती पुस्तिकेतील लॉग इन आयडी पासवर्डचा वापर करून लॉग इन व्हा आणि पासवर्ड बदला.

अर्जाचा भाग 1 भरताना
वेबसाईटवरील सूचनांप्रमाणे टप्याटप्याने ऑनलाईन अर्ज भरा.

महाराष्ट्र राज्य मंडळाची दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्याचा बैठक क्रमांक टाकल्यानंतर सर्व माहिती तिथे दिसेल.

अर्ज शक्यतो महाविद्यालयातील मार्गदर्शन केंद्रातून भरावा. आपण स्वतःही अर्ज भरू शकतो.

पहिला भाग भरून झाल्यानंतर महाविद्यालयात असणाऱ्या मार्गदर्शन केंद्रातून अर्ज अप्रुव्ह करून घ्या.

अर्जाचा भाग 2 दहावीच्या निकालानंतर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात लागणार असण्याची शक्यता आहे. त्यानंतर अर्जाचा दुसरा भाग भरता येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आधी एक भाग भरून त्याचे अप्रुव्हल घ्यायचे आहे.

संपर्कासाठी वेबसाईट

www.dydepune.com
http:/Pune.11thadmission.net