केडगाव गावठाणातील गायरान जमिनीवर अतिक्रमणे सुरूच

दौंड : अब्बास शेख – गायरान जमिनींवर अतिक्रमण करून बांधकाम करणाऱ्यांबरोबरच या बांधकामांच्या नोंदीसाठी दाखले देणाऱ्या सरपंच आणि ग्रामसेवकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश मागील काळात पालकमंत्री गिरीश बापट यांनी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना दिले होते. गायरान जमिनींवरील अतिक्रमणांचा विषय जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत लोकप्रतिनिधी आणि नियोजन समितीच्या सदस्यांनी उपस्थित केला होता. त्यावेळी बोलताना पालकमंत्री गिरीश बापट यांनी वरील आदेश दिले होते. परंतु अजूनही अनेक ठिकाणी गायरान जमिनींवरील अतिक्रमण आणि बांधकामे कमी होताना दिसत नाहीत, उलट आता काही ग्रामपंचायत सदस्य आणि गावपुढारी मिळून अश्या अतिक्रमनांना खत पाणी घालत असल्याचे समोर येत आहे.

दौंड तालुक्यातील केडगाव गावठाण येथेही गायरान जमिनींवर अशीच अतिक्रमणे आणि बांधकामे सुरू असुन केडगाव गावठाणातील काही महाभागांनी स्वतःची पक्की घरे असतानाही गायरानात मोक्याच्या ठिकाणी जागा पकडून तेथे फाउंडेशन, कंपाउंड आणि घरे बांधून ती अन्य व्यक्तींना लाखो रुपयांना विकण्याचा धंदाच सुरू केला असल्याचे ग्रामस्थांमधून बोलले जात आहे. ग्रामपंचायत मात्र गायरान जागेत दररोज होत असलेल्या अतिक्रमानांना रोखण्यास असमर्थ ठरत असल्याचे दिसत आहे. वास्तविक पाहता  गायरान जमिनी या ग्रामपंचायतींच्या ताब्यात आहेत. केडगाव गावठाणातील गायरान जमिनी या अत्यंत मोक्‍याच्या ठिकाणी आहेत.

या मोक्याच्या जमिनींवर अनेकांनी आपली अनधिकृत घरे उभारली असून काही ठिकाणीतर एका रात्रीमध्ये कच्च्या विटा, दगड वापरून घरांचे फाउंडेशन, वॉल कंपाउंड व घरे बांधण्यात येऊन जागा बळकाविण्याचे प्रकारे सुरू आहेत. ग्रामपंचायतीकडून मात्र अश्या लोकांवर ठोस कारवाई केली जात नसल्याचा आरोप ग्रामस्थ करत असून जर कारवाई केली असेल तर त्याबाबत माहिती जाहीर करण्यात यावी अशी मागणी होत आहे.

केडगावच्या गायरान जमिनीत जर अशीच अतिक्रमणे होत राहिली तर गायरान जमिनीचा एक गुंठाही शिल्लक राहणार नाही ही वस्तुस्थिती आहे.

गायरान जमिनींवर घरांच्या नोंदी घेणाऱ्या अधिकारी अथवा सरपंच यांना दोषी धरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी मागील काळात सांगितले होते.

गायरान जमिनींवर अतिक्रमण करून त्याच्या नोंदी करणे ही चुकीची पध्दत आहे. यातून गैरव्यवहार चालतात. यामध्ये लोकांची फसवणूक मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे गायरान जमिनीवर घरांच्या नोंदी करण्यासाठी दाखले देणाऱ्या ग्रामसेवक आणि सरपंचांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश बापट यांनी यावेळी देत गायरान जमिनींवरील बांधकामांना मदत करणाऱ्या सरपंच अथवा ग्रामपंचायत सदस्य यांना निवडणुक लढविता येता कामा नये, यासाठी त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्याची सूचनाही बापट यांनी यावेळी दिली होती परंतु पालकमंत्र्यांच्या आदेशाला या ठिकाणी हरताळ फासला जात  असल्याचे दिसून येत आहे.

केडगावच्या गायरान जमिनींवरील अतिक्रमण वाढत असल्याबाबत केडगाव गावठाणात वास्तव्यास असणारे केडगावचे विद्यमान सरपंच अजित शेलार यांना विचारले असता या प्रकरणी कुणी, कुठे अतिक्रमण केले आहे याबाबत पाहणी करण्यात येईल असे सांगितले.