लाच मागणाऱ्या तहसिलदाराच्या जीपला बांधली म्हैस

भोपाळ : वृत्तसंस्था – लगे रहो मुन्नाभाई या चित्रपटात संजय दत्त रेडिओ जॉकी बनून पीडित आणि दु:खी लोकांच्या अडचणी सोडवत असतो. अगदी, चित्रपटात संजूबाबाने सांगितलेल्या गांधीगिरीटाईप या शेतकऱ्याने तहसिलदारला धडा शिकवला आहे. शेतकऱ्याकडे १ लाख रुपयांची लाच मागणाऱ्या तहसिसदाराच्या गाडीला शेतकऱ्याने आपली म्हैस बांधली. शेतकऱ्याच्या या गांधीगीरीमुळे तहसिलदाराची लाचखोरी चव्हाट्यावर आली आहे. ही घटना आहे मध्य प्रदेशातील भोपाळ येथे घडली.

देवगाव येथील शेतकरी लक्ष्मण यादव यांच्याबाबत ही घटना घडली असून खरगापूरचे तहसिलदार चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. दरम्यान, याप्रकरणी बलदेवगडच्या एसडीएम वंदना राजपूत यांनी चौकशी सुरू केली असून तहसिलदार सुनिल वर्मा दोषी आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे संकेतही राजपूत यांनी दिले आहेत.

शेत जमिनीचे नामांतरण करण्यासाठी या शेतकऱ्याकडे तहसिलदाराने १ लाख रुपयांची लाच मागितली होती. या शेतकऱ्याने तहसिलदारांना ५० हजार रुपये दिले. मात्र, उर्वरीत ५० हजार रुपये दिल्याशिवाय काम करत नसल्यामुळे शेतकऱ्याने ५० हजार रुपयांच्या बदल्यात आपली म्हैसचं तहसिलदाराच्या जीपला बांधली.

त्यानंतर, तहसिलदाराला काय करावे हेच कळेना. त्यामुळे लवकरच काम करतो, असे आश्वासन तहसिलदाराने दिले. तसेच पोलिसांना बोलावून ती म्हैसही घेऊन जाण्यास बजावले. त्यावर, पोलिसांनी जीपला बांधलेली म्हैस सोडवून एका झाडाला बांधली. त्यामुळे तात्पुरती तहसीलदाराची सुटका झाली. पण, या घटनेची वाच्यता सर्वत्र झाली असून या जीपचे फोटोही व्हायरल झाले आहेत. तसेच ही बातमी जिल्हाधिकारी यांच्यापर्यंत पोहोचल्यामुळे त्यांनी एसडीएसकडे याबाबत विचारणा करत अहवाल मागितला आहे.