ममतांच्या वादग्रस्त छयाचित्राबाबत त्या तरुणीला जामीन, तरुणीच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर अभियान  

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे फेरफार केलेले छायाचित्र सोशल मीडियावर टाकणाऱ्या प्रियंका शर्मा या तरुणीला सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. प्रियंका शर्माने त्या छायाचित्रासाठी लेखी माफी मागितली पाहिजे, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले होते पण नंतर कोर्टाने तात्काळ त्या तरुणीला सोडण्याचे आदेश दिले.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे फेरफार केलेले छायाचित्र सोशल मीडियावर टाकल्याबद्दल प्रियंका शर्मा या तरुणीला बंगालच्या पोलिसांनी अटक केली होती. प्रियांका शर्मा या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्या आहेत. प्रियांका शर्मा यांनी प्रियांका चोप्रा यांचा सध्या व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये छेडछाड करून प्रियांका चोप्रा यांच्या जागी ममता बॅनर्जी यांचा फोटो लावला होता. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली होती. पोलिसांच्या या कारवाईविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाली होती.  न्या. इंदिरा बॅनर्जी आणि न्या. संजीव खन्ना यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. सशर्त माफी मागावी असे न्यायालयाने सुरवातीला आदेश दिले होते नंतर मात्र कोर्टाने माफी मागण्याचे आदेश मागे घेतले.

सशर्त माफी मागण्याच्या कोर्टाच्या निर्णयाला प्रियांकाच्या वकीलाने विरोध केला. यांमुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत आहे, असे प्रियांकाच्या वकीलाचे म्हणणे होते. भाजप नेत्यांच्या देखील अशाप्रकारे खिल्ली उडविले जात असल्याचे वकिलाने  न्यायालयाला सांगितले. यांवर सुप्रीम कोर्ट म्हणाले की अभिव्यक्ती स्वातंत्र्य तेव्हापर्यंत आहे जेव्हापर्यंत कुणाला काही त्रास होणार नाही. आरोपी हा सामान्य व्यक्ती नाही, तो एक राजकीय कार्यकर्ता आहे. नंतर मात्र कोर्टाने माफी मागण्याची अट काढून टाकली.

प्रियांका यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर अभियान देखिल चालू केले गेले. #isupportpriyankasharma हा हॅशटॅग वापरून सोशल मीडियावर अभियान राबविण्यात आले. भाजपच्या युवा नेत्याला अशाप्रकारे अटक करणे ही  तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आहे, असे आसाममधील भाजपचे  नेते  हेमंत  शर्मा यांनी म्हंटले आहे. काही नेट युजर्सनी ममता बॅनर्जी यांच्या छेडछाड केलेला फोटो डीपीला ठेऊन या घटनेचा निषेध केला आहे.