जेव्हा बिबट्या घेतो बाथरुममध्ये आसरा…

पालघर : पोलीसनामा ऑनलाइन – पालघर तालुक्यातील किनारपट्टीवरील दांडी येथे एकाला बिबट्या दिसला. त्याने ही गोष्ट इतरांना सांगितली. पण येथे बिबट्या येणार कोठून तो मोठा बोका असावा, असे म्हणून इतरांनी त्याची थट्टा उघडविली. पण काही वेळातच गुरगुरण्याचा आवाज आला. बॅटरीच्या झोतात जेव्हा बिबट्याचे डोळे चकाकले, तेव्हा पाहणाऱ्यांची पाचावर धारण बसली.

दांडी येथील विजय तामोरे ह्यांच्या पडक्या घरात २ वर्षाचा बिबट्या स्नानगृहात अडकून पडला होता. वनविभागाने त्याला पकडण्यासाठी पिंजरे लाऊन प्रयत्न चालू ठेवले असताना २ तासाच्या अथक प्रयत्नानंतर त्याला पकडण्यात यश आले आहे.
भाजप चे माजी तालुकाध्यक्ष विजय तामोरे यांचे दांडी येथे घर असून त्या घरात जास्त वावर होत नसल्याने ते बंद अवस्थेत असते. सोमवारी संध्याकाळी साडेसात वाजल्याच्या सुमारास एका ग्रामस्थांला बिबट्या दिसल्याचे त्यांनी इतर सहकाऱ्यांना सांगितले. मात्र इथे गावात बिबट्या कसा येणार तो मोठा बोका असावा असा तर्क करीत त्याची थट्टा उडवली. मात्र काही लोकांनी बॅटरी च्या प्रकाश झोतात त्या घरात शिरून पाहणी करण्यास सुरुवात केली असता जुन्या-पडीक स्नानगृहातून गुरगुरण्याचा आवाज ऐकू आला. काही तरुणांनी मोठ्या हिंमतीने स्नानगृहात पाहिले असता २ ते ३ वर्ष वयाचा बिबट्या घाबरून दबा धरून बसल्याचे आढळून आले. त्या स्नानगृहाचा दरवाजा बंद करून ग्रामस्थांनी त्याला बंदिस्त करीत वनविभाग आणि सातपाटी सागरी पोलिसांना माहिती दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर ह्यांनी तात्काळ दांडी येथे धाव घेत ग्रामस्थांना सुखरूप स्थळी हलविले. वनविभागाने त्या बिबट्याला पकडण्यासाठी दोन पिंजरे लावले असताना एका पिंजऱ्यात त्याला पकडण्यात यश आले आहे.