राष्ट्राच्या उभारणीचा मुख्य पाया शिक्षकच : गोयल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

शिक्षक म्हणजे समाजाचा योग्य दिशानिर्देशक. शिक्षक मुलांचा सर्वांगीण विकास घडवून सुसंस्कारित पिढी निर्माण करतात. हीच पिढी देशाच्या विकासात महत्वाचा वाटा उचलते. म्हणूनच राष्ट्र उभारणीचा मुख्य पायाच शिक्षक आहे. असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. असे मत गोयल गंगा फौंडेशनचे विश्वस्त जयप्रकाश गोयल यांनी व्यक्त केले. पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळूफुले नाट्यगृह येथे गोयल गंगा फौंडेशनचा ११ वा स्थापना दिवस साजरा केला. यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाला गोयल गंगा फौंडेशनचे विश्वस्त जयप्रकाश गोयल, गीता गोयल, एस. बी. मंत्री, गोयल गंगा इंटरनैशनल स्कूलच्या संचालिका सोनू गुप्ता, प्रमुख पाहुणे अरुण गुप्ता, महासागरांना प्लास्टिक प्रदूषणापासून वाचवण्याचे काम करणारे ‘सागरमित्र’ चे संस्थापक विनोद बोधनकर आणि मुख्याध्यापिका भारती भागवाणी उपस्थित होते. गोयल गंगा स्कूलच्या वतीने दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना देण्यात येणारी ‘कलादीप शिष्यवृत्ती’ अंजली नायर, उत्कर्ष रस्तोगी, समरीद्धी यांना देण्यात आली. अरुण गुप्ता यांच्या हस्ते ही शिष्यवृत्ती देण्यात आली.  गोयल गंगा इंटरनैशनल स्कूल मध्ये गेल्या दहा वर्षापासून कार्यरत असणाऱ्या शिक्षकांचा सन्मान जयप्रकाश गोयल यांच्या हस्ते करण्यात आला.

[amazon_link asins=’B01AHW5EQ0′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9cb926a0-a5c5-11e8-958f-7595bc36491e’]

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रख्यात पर्यावरणवादी व ‘सागरमित्र’ चे संस्थापक विनोद बोधनकर यांनी विद्यार्थांना पर्यावरणाच्या ऱ्हासा विषयी अवगत केले.  प्रदूषणाचा विचार जागतिक स्तरावर करा मात्र प्रदूषण थांबवण्यासाठी वैयक्तिकरित्या कार्य करा असे मत त्यांनी मांडले. प्लास्टिक बंदीचे समर्थन करताना ते म्हणाले, प्लास्टिक मुळे आपण पर्यावरणाचे न भरून येणारे नुकसान करतो आहोत. प्लास्टिकचे विघटन होत नसल्याने  ते पर्यावरणाच्या नाशाला कारणीभूत ठरत आहे. समुद्रात व नद्यांमध्येही प्लास्टिक कचरा साठल्यामुळे जलचर प्राण्यांचे जीव धोक्यात आले आहेत. पर्यावरणविषयक समस्यांचे निराकरण करण्यासाठी त्यासंदर्भातील प्रबोधन करण्यासाठी आपल्या मुलांच्या ऊर्जेचा वापर करण्याचा आग्रह त्यांनी पालकांना केला.

सध्याची पिढी प्रयोगशील असल्याने सतत सर्वोत्तम बनण्यासाठी प्रयत्नशील असते. यासाठी ते आपापल्या क्षेत्रात झोकून देऊन काम करतात. अशी भावना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अरुण गुप्ता यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी शहरातील १५ हुन अधिक शाळांनी सहभाग घेतलेल्या  ‘स्वरगीत’  या शास्त्रीय संगीत गायन स्पर्धेत  रहाटणी येथील एसएनबीपी स्कूलला पहिले तर आंबेगावच्या पोद्दार इंटरनैशनल स्कूलला दुसरे पारितोषिक पटकविले.