भाजपकडून माझ्या पतीच्या फोटोंचा गैरवापर, जयश्री वनगांची तक्रार

पालघर : पोलीसनामा आॅनलाईन

दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या पत्नी जयश्री वनगा यांनी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे तक्रार दाखल केली आहे. दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या फोटोचा आणि नावाचा भाजपकडून गैरवापर केला जात असल्याचा आरोप जयश्री वनगा यांनी केला असून, भाजपविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.

पहा जयश्री वनगा यांनी तक्रारीत नेमकं काय म्हटलंय?
भाजप पक्षाचे विधान परिषदेचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचार साहित्यावर अनेक ठिकाणी माझे पती दिवंगत चिंतामण वनगा यांच्या छायाचित्रांचा वापर करण्यात आला आहे. सदर निवडणूकीच्या प्रचार साहित्यावर दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचे फोटो किंवा नाव वापरण्याच्या संदर्भात माझी किंवा वनगा कुटुंबीयांची कोणत्याही प्रकारची लेखी परवानगी भाजपच्या कोणत्याही नेत्याने किंवा पदाधिकाऱ्याने घेतली नाही. त्यामुळे आचारसंहितेचा भंग होत असून, भाजपवर कारवाई करण्याचे आदेश द्यावेत अशी विनंती जयश्री वनगा यांनी आपल्या तक्रारीत केली आहे.

केवळ मताची भीक मागण्यासाठी भाजपकडून हा निंदनीय प्रकार केला जात असल्याची टीकाही जयश्री वनगा यांनी केली आहे. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपाकडून राजेंद्र गावित यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर शिवसेनेकडून दिवंगत चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेना- भाजप एकमेकांच्या विरोधात उभे असल्यामुळे ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. भाजपकडून कुठेही आणि कोणत्याही प्रचार साहित्यावर माझ्या पतीचे फोटो किंवा नाव वापरले व छापले जाऊ नयेत, अशी सक्त ताकीद निवडणूक आयोगाने द्यावी अन्यथा मला न्यायालयात जाऊन दाद मागावी लागेल, असा इशाराही जयश्री वनगा यांनी दिला आहे.