पोलीस आयुक्तांनी गाठीभेटीतुन वेळ काढत शहरातील गुन्हेगारी रोखण्याची गरज

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत चोऱ्यामाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची नियुक्ती झाल्यापासून आयुक्तालयाच्या हाकेच्या अंतरावर दुकाने फोडण्यात आली, पोलीस वसाहतीमध्ये चोरीचे प्रकार घडले, आळंदीत एटीएम सेंटर फोडले, सांगवीत खून व इतर ठिकाणी किरकोळ मारामारीचे प्रकार सुरु आहेत. शहरात अवैध धंद्यावर कारवाई सत्र सुरु आहे म्हणजेच अवैध व्यवसाय सुरु आहेत. त्यामुळे गुन्हेगारांचा कर्दनकाळ अशी ओळख असणाऱ्या पोलीस आयुक्तांनी थोडे गाठीभेटीला बगल देत शहरात वाढत चाललेल्या चोऱ्यामाऱ्यावर ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. विशेष म्हणजे आयुक्तांच्या स्वागतासाठी येणारे कोण आहेत याचीही खात्री होणे गरजेचे आहे.

कृष्ण प्रकाश यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त म्हणून 5 सप्टेंबर रोजी पदभार स्विकारला. दोन दिवस मला अभ्यास करु द्या, त्यानंतर शहरात काम सुरु करणार असल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले. यामुळे
शहरवासीयांना मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या. मात्र नवीन पोलीस आयुक्त आले आणि चोरट्यानी पुन्हा डोके वर काढले.

आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चिंबळी येथे असलेले एटीएम सेंटर चोरट्यानी गॅस कटरच्या सहाय्याने कापले. मशीन मध्ये असलेले 9 लाख 51 हजार रुपये लंपास केले. गेले अनेक महिन्यांपासून एटीएम चोरीचे थांबलेले गुन्हे पुन्हा सुरु झाले आहेत. स्थानिक पोलीस, गुन्हे शाखा याचा शोध घेत आहेच.

याच बरोबर पोलीस आयुक्तालय असलेल्या
प्रेमलोक पार्क मध्ये चोरीची घटना घडली. आयुक्तालयापासून हाकेच्या अंतरावर एक, इंदिरानगर मध्ये एक आणि चिंचवड गावात एक अशी तीन दुकाने एकाच रात्री फोडण्यात आली आहेत. यामध्ये एका ठिकाणी चोरीचा प्रयत्न झाला आहे, परंतु चोरट्यांनी दुकानात प्रवेश करता आलेला नाही. ही असतानाच पोलीस वसाहत असलेल्या अजमेरा कॉलनीत ही चोरीची घटना घडली.

पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वाढत चाललेल्या चोऱ्यामाऱ्यांचे प्रकार, वाढती गुन्हेगारी आणि व्हाईट कॉलर क्राईम मोडून काढण्याचे आवाहन पोलिस आयुक्तांसमोर आहे. पोलीस आयुक्तांनी याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. शहरवासीयांना असलेला विश्वास सार्थ करण्यासाठी आपल्या स्वागतासाठी होत असलेल्या गाठीभेटीतुन वेळ काढून यावर आळा घालण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.