जनसेवक म्हणवणार्‍यांनी कोविड सेंटर उभारावेच, समाजबांधवांची भावना

पुणे : दक्षिण पुण्यातील एक नगरसेवक 40 बेडचे व्हेंटिलेटर हॉस्पिटल उभारू शकतो, तर इतर नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री का करू शकत नाहीत. पुण्यातील प्रत्येक नगरसेवकांने आपापल्या प्रभागामध्ये असे रुग्णालय उभारले, तर सामान्यांच्या आरोग्याची हेळसांड होणार नाही. कोरोनाच्या संकटामध्ये मतदारांना मदत करण्याची संधी आहे, त्यासाठी जनसेवक म्हणविणाऱ्यांनी कोविड सेंटर उभारले पाहिजेत, अशी आशा समाजबांधवांकडून व्यक्त होत आहे.

नगरसेवक, आमदार, खासदारांकडे रेमडिसिव्हर इंजेक्शन, कोविड लस, व्हेंटिलेटर बेड, ऑक्सिजनसाठी विचारणा केली, तर मी क्वारंटाइन आहे असे उत्तर मिळते. नाही, तर मी बाहेरगावी आहे किंवा नॉट रिचेबल असे उत्तर मिळत आहे. त्यामुळे मतदारांनी भविष्यात सावध पवित्रा घेतला पाहिजे. ही मंडळी फक्त 15 दिवस तुमच्याकडे येणार आणि पुन्हा तुम्हाला त्यांच्यामागे किरकोळ कामासाठी पळविणार, हे खपवून घेणार नाही, अशी भीष्म प्रतिज्ञा करायला पाहिजे.

राज्यकर्त्यांनो निवडणुका जवळ आल्या की, फ्लेक्स आणि जाहिरातींद्वारे मतदारांसाठी भली मोठी आमिषांची यादी सादर करता. त्यातील किती कामे पूर्ण केली हा भाग गौण आहे. मात्र, आता प्रत्येक नागरिक कोरोनाशी झुंज देत आहे. त्यांना आरोग्य सेवेची गरज आहे. त्यामुळे किमान सामाजिक जबाबदारी म्हणून तरी आरोग्य सेवा देण्यासाठी एक पाऊल पुढे टाकण्याची तसदी घ्या. कात्रजमधील एक मनसेचा नगरसेवक 40 बेडचे हॉस्पिटल उभे करू शकतो, तर तुम्ही का करू शकत नाही. महापौर, उपमहापौर, नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, सदस्य, प्रभाग समिती अध्यक्ष अशी भली मोठी पदांची श्रेयनामावली आहे. त्या पदांचे पावित्र्य राखण्यासाठी तरी आरोग्य सेवा मतदारराजाला द्यायला काय हकत आहे. अजूनही वेळ गेली नाही, आता तरी जागे व्हा आणि मायबाल सरकार राज्यकर्त्यांनो मतदारांची काळजी घ्या, असे आवर्जून सांगावेसे वाटत आहे.

नगरसेवक, आमदार, खासदार बनवणारी सामान्य जनता कोविड लस, रेमडिसिव्हर , बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर अशा काही मुलभूत आरोग्य सेवेविना तडफडत आहे. राज्यकर्ती मंडळी सामान्यांचे लक्ष विचलित करण्यासाठी एकमेकांवर आरोपप्रत्यारोप करीत आहेत. आमचा नेता हक्काचा माणूस, आमचे आदर्श, आमचं काळीज असे म्हणत भले मोठे थोरले फ्लेक्स लावून त्यांचा वाढदिवस साजरा करता. त्यांच्याकडून कोरोनाच्या भयावह परिस्थिती उपचारासाठी कोविड सेंटर उभे करण्याची अपेक्षा आहे. त्यांच्याकडून ही अपेक्षा पूर्ण होणार नसेल, तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये मते मागायला आल्यानंतर त्यांना त्यांची जागा दाखवायला कमी करू नका, असा सबुरीचा सल्ला मतदारराजाला द्यावासा वाटत आहे.

पालिकेच्या निवडणुका आठ-नऊ महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे किमान निवडणुका डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक नगरसेवकासह इच्छुकांनी आपापल्या परिसरातील एखाद्या मंगल कार्यालयामध्ये 30-40 बेडचे कोविड सेंटर सुरू करून लोकांचे प्राण वाचवावेत. तेच तुमचे हक्काचे मतदार असणार आहेत. त्यामुळे चालून आलेली संधी दवडू नये, अशी भावना सामान्य नागरिकांनी व्यक्त केली.

ऑक्सिजन बेड नाही, म्हणून डॉक्टरला नावे ठेवण्यापेक्षा तुम्ही निवडून दिलेल्या दमदार आमदार, दबंग खासदार, भावी आमदार, नगरसेवकांसह सर्वांना बिरुदावली लावणाऱ्यांना कार्यकर्त्यांनी जाब विचारला पाहिजे. मागिल वर्षी कोरोना आटोक्यात आल्यानंतर सहा महिन्यांमध्ये आरोग्य यंत्रणेने एखादे कोविड सेंटर का उभारलं नाही. ज्यांना तुम्ही निवडून दिले आहे, त्यांना विचारण्याची धमक कार्यकर्त्यांनी ठेवली पाहिजे. नुसतंच आमचा नेता हक्काचा माणूस, आमचे आदर्श, आमचं काळीज असं म्हणत आयुष्य काढत आहात, असे प्रकार आता कुठे तरी थांबवा. आता डॉक्टरला दोष देऊन कसं चालेल, मित्रांनो… विचार करा… मंत्री, आमदार, खासदार, नगरसेवक यांना बेड मिळतात. मात्र, मंत्री, आमदार खासदार नगरसेवक बनवणाऱ्या गोरगरीब जनतेचं आरोग्य सेवा मिळत नाही, याचा जाब विचारण्याची हीच खरी वेळ आहे.