आमच्यावर घोडेबाजाराचा आरोप करणा-यांनी तर तबेलाच विकलाय : अमित शहा

दिल्ली : वृत्तसंस्था

आमच्यावर घोडेबाजाराचा आरोप केला जात आहे, मात्र काँग्रेसने तर संपूर्ण तबेलाच विकून खाल्ला आहे, अशी जळजळीत टीका भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केली. कर्नाटकातील नाट्यमय घडामोडी नंतर पहिल्यांदाच अमित शाह यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

कर्नाटकमध्ये भाजप मोठा पक्ष असल्याने आम्ही सत्ता स्थापनेचा दावा केला. मात्र गोवा किंवा मणिपूरमध्ये काँग्रेसने मोठा पक्ष असतानाही सत्ता स्थापनेचा दावा केला नव्हता, त्यांचे नेते आराम करत होते, असे अमित शाह म्हणाले. तसेच, काँग्रेस पक्ष इतिहास विसरला असून, देशात सर्वाधिक वेळा राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे काम त्यांनीच केले आहे, असा आरोपही अमित शाह यांनी केला.

कर्नाटकमध्ये जनमत हे स्पष्टपणे काँग्रेसच्या विरोधात आहे. जनतेने काँग्रेसला पूर्णपणे नाकारले आहे. सत्ताधारी असणार्‍या काँग्रेसचे अर्ध्याहून अधिक मंत्रिमंडळ पराभूत झाले, मुख्यमंत्री एका मतदार संघातून पराभूत झाले, तर एका मतदार संघातून काठावर विजयी झाले आहेत. अमित शाह पुढे म्हणाले, भाजपतर्फे मी कर्नाटकच्या जनतेचे आभार मानत असून, या निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. याआधी आम्हाला 40 जागा होत्या, आता 104 जागा मिळाल्या आहेत. मतदानाची टक्केवारीही वाढली आहे.

ईव्हीएम आणि निवडणूक आयोगाचा उल्लेख करुनही शहांनी काँग्रेसला चांगलेच फैलावर घेतले. ‘आता काँग्रेसला ईव्हीएम आणि निवडणूक आयोगाबद्दल विश्वास वाटू लागला आहे. अर्धवट विजय मिळूनही काँग्रेसला ईव्हीएम आणि निवडणूक आयोग आवडू लागला आहे, हे खूप बरे आहे, विरोधकांच्या एकजुटीवर बोलताना ते म्हणाले. अखिलेश यादव, ममता बॅनर्जी 2014 मध्येही आमच्या विरोधात होते. 2019 मध्ये असतील. 2019 मध्ये आम्ही 2014 पेक्षा मोठा विजय मिळवू.